नारळ छिलण्याच्या हत्याराने तरुणावर हल्ला; एकाचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी

औराद शहाजनी, (जि. लातूर) — बहिणीचं लग्न मोडल्याच्या कारणावरून विचारपूस करण्यासाठी गेलेल्या युवकावर केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडली
याबाबत अधिक माहिती अशी की अखिल जलील बेलुरे वय 25 वर्ष, त्याचा मित्र बबलू लायक भातांब्रे वय24 वर्ष हे दोघेजण अखिलच्या बहिणीची सोयरिक मोडल्या कारणास्तव जाब विचारण्यासाठी लातूर-जहिराबाद या महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बबलू महेताबसाब बागवान वय25 वर्ष याच्याकडे सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली.
बबलू बागवान यांने नारळ छिलन्याच्या हत्याराने अखिल व बबलू भातांब्रे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अखिल व भातांब्रे गंभीर जखमी झाले. अखिल बेलुरे यास पुढील उपचारासाठी निलंगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच निलंगा येथील डॉक्टरांनी अखिल यास मयत घोषित केले, तसेच बबलू भातांब्रे यास येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमोपचार करण्यात आले. याप्रकरणातील हल्लेखोरही जखमी झाला आहे.दरम्यान भरचौकात तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सपोनि. संदीप कामत, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे यांच्यासह पोलिस उपस्थित होते. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.