35 वर्षीय महिलेच्या डोळ्यातून निघताहेत चक्क दगड !

म्हैसूर (कर्नाटक) : कर्नाटकच्या हुनसूर तालुक्यातील विजया नावाच्या 35 वर्षीय महिलेच्या डोळ्यातून चक्क दगडं निघत आहेत. अशीच एक घटना बीड जिल्ह्यात देखील घडली होती. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा हातचलखीचा प्रकार असल्याचं उघडकीस आणलं होतं.
काही दिवसांपूर्वी जेव्हा तिला डोकेदुखीचा त्रास झाला तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्यासोबतच तिच्या डोळ्यातून दगडासारख्या कठीण वस्तू बाहेर पडत होत्या. गावच्या शाळेतील शिक्षिका जरीना ताज यांनी त्यांच्या घरी भेट दिली तेव्हा त्यांना ही समस्या समजली. त्यानंतर जवळच्या चल्लाहल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी केली असता डोळ्यांचा त्रास असल्याचे दिसून आले. महिलेने शहरातील शासकीय रुग्णालयात जाऊन नेत्रतज्ञांनी तपासणी केली.
विजया यांनी त्यांची समस्या माध्यमांसमोर व्यक्त केली त्या म्हणाल्या, “मला डोक्याच्या मेंदूच्या भागात दुखत होते आणि संपूर्ण चेहरा टोचल्यासारखा वाटत होता. तर डोळ्याच्या समोरील बाजूने दगड तुकड्यासारखा पडत होता. हे गेल्या शनिवारी पहिल्यांदाच पाहायला मिळाले. आतापर्यंत डोळ्यातून 200 हून अधिक दगड पडले आहेत. हे मी माझ्या गावातील लोकांना सांगितले, मात्र त्यांचा यावर विश्वास बसला नाही.माझी दृष्टी ठीक आहे, पण मला वेदना खूप होतात”.
विजयाची आई शिवम्मा म्हणाल्या, “माझ्या मुलीला हे कसं झालं माहीत नाही. गेल्या आठ दिवसांत दिवसातून दोनवेळा दगडांची पडझड होत आहे. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. कोणीतरी आम्हाला मदत करावी”, अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबत माहिती देणार्या एका डॉक्टरनेही या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. डॉक्टर म्हणाले, चाचणीच्या अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. आमच्यासाठी ही पहिलीच केस आहे. या महिलेला तिच्या डोळ्यात दगडाचे चट्टे घालत असतील किंवा लहान वयात चिखल खाण्याची सवय असेल का असे विचारले असता तिने नाही म्हटले. अहवाल आल्यानंतर याबाबत माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.