आपला जिल्हा

विद्येचे माहेरघर असलेल्या अंबाजोगाईत प्रचंड विरोधानंतर कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

अंबाजोगाई — कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींच्या अंत्यसंस्कारास दोन ठिकाणच्या नागरिकांनी विरोध दर्शविल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास प्रशासनाने अंत्यसंस्कार करत अखेर या मृतदेहांची विटंबना थांबवली

बुधवारी मध्यरात्री अंबाजोगाई येथील वृद्धाचा व सिरसाळा येथील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दोन्ही मृतदेहावर गुरुवारी बोरुळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित करण्यात आले मात्र प्रशासनाने अंत्यसंस्काराची सर्व तयारी केल्यानंतर येथील नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यास कारणही तसेच घडले होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली येथील युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर बोरूळा तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र अंत्यविधी नंतर स्मशानभुमी चे निर्जंतुकीकरण न करण्यात आल्याचा व मास्क तसेच ग्लोव्ज त्या ठिकाणी टाकण्यात आल्याचा आरोप करत नगरसेवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कोरोना बाधित मयतावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत अशी भूमिका घेतली होती.परिस्थिती चिघळत असल्याने प्रशासनाने स्वाराती रुग्णालय परिसरात अंत्यविधीचा निर्णय घेतला. मात्र, तिथल्याही नागरिकांनी मुलांचे खेळण्याचे मैदान आणि वस्ती जवळ असल्याचे कारण पुढे करून विरोध दर्शविला. त्यानंतर मांडवा रोडवरील सर्व्हे क्र. १७ मध्ये अंत्यविधीसाठी तात्पुरते शेड उभा करण्याचे काम हाती घेण्यात आले. अचानकच सायंकाळी पुन्हा बोरूळ तलावात अंत्यसंस्काराचा निर्णय घेऊन तयारी सुरु करण्यात आली. हे पाहून पुन्हा शेकडोंचा जमाव विरोधासाठी जमला. हा प्रकार रात्री १० वाजेपर्यंत सुरु होता. त्यानंतर मात्र प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त पाचारण करत मुकुंदराज रोडवरील सार्वजनिक स्मशानभूमीत शुक्रवारी पहाटे १ वाजता त्या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आणि दिवसभर सुरु असलेली त्या मृतदेहांची विटंबना थांबली. 

अंत्यसंस्कार रखडल्याचे प्रकरण प्रसिद्धी माध्यमाद्वारे बाहेर येताच खळबळ उडाली. यावर तोडगा काढून लवकर अंत्यविधी आटोपण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव सुरु झाला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे स्वतः प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. अखेर शुक्रवारी पहाटे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उपअधीक्षक राहुल धस, नगरपरिषद मुख्याधिकारी सुधाकर जगताप, पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या उपस्थितीत आणि प्रचंड पोलीस बंदोबस्तात स्वच्छता निरिक्षक अनंत वेडे यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अंत्यविधी आटोपले. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close