तरंगत्या रंगमंचावर नृत्याविष्कार;रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले

बीड — चोहोबाजूंनी पाणीच पाणी,पाठीशी शंभू महादेव मंदिर अन जलाशयाच्या मध्यभागी तरंगता रंगमंच .या तरंगत्या रंगमंचावर भरतनाट्यम च्या माध्यमातून गणेश वंदनेसह वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करणाऱ्या कलाकार.एका आगळ्यावेगळ्या वातावरणात बीड सहित 14 जिल्ह्यातून आलेल्या संस्कार भारतीच्या कलासाधकांनी या नृत्याविष्काराचा याची देही याची डोळा अनुभव घेतला अन भरभरून दाद दिली.
बीड येथे आयोजित संस्कार भारतीच्या कलासाधक संगम कार्यक्रमात सायंकाळी बीडच्या कंकालेश्वर मंदिर परिसरातील जलाशयात तरंगत्या रंगमंचावर नृत्यविधा सादरीकरण करण्यात आले.यावेळी बीड,नांदेड आणि संभाजीनगर येथील कलासाधकांनी आपली कला सादर केली.
गेल्या 25 वर्षांपासून संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नववर्षाचे स्वागताचा कार्यक्रम तरंगत्या रंगमंचावर घेतला जातो.कलासाधक संगम च्या निमित्ताने शनिवारी देवगिरी प्रांतातील कलासाधकांनी या अनोख्या रंगमंचावर आपली कला सादर करून रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.