क्राईम

नदीच्या पुरात बालमटाकळीच्या एकाच कुटुंबातील तिघे मोटारसायकलसह वाहून गेले

मुलीचा मृतदेह व मोटार सायकल सापडली

गेवराई — तालुक्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. मात्र रात्री बालमटाकळी येथील एका मोटार सायकलस्वाराने अमृता नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असताना देखील मोटारसायकल घातली.यामध्ये त्याच्यासह त्याची दोन्ही मुले वाहून गेली दरम्यान मुलीचा मृतदेह व मोटारसायकल सकाळी सापडली असून अग्निशामक दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेहांचा शोध सुरू आहे.
शेवगाव (जि.अहमदनगर) तालुक्यातील बालमटाकळी येथील कृष्णा बाळासाहेब घोरपडे (३२ वर्षे) यांची गेवराई तालुक्यातील देवपिंप्री ही सासरवाडी आहे. दरम्यान गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कृष्णा घोरपडे वय 35 वर्ष बालमटाकळी येथून त्यांचा मुलगा प्रथमेश ८ वर्षे व वैष्णवी ६ वर्षे या दोघांना घेऊन देवपिंप्री येथे मोटारसायकल वरुन निघाले होते. ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पौळाचीवाडी जवळ आले होते. यावेळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा घोरपडे हे मोटारसायकल व दोन मुलांसह पाण्यात वाहून गेले. दरम्यान शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी शोधकार्य सुरु केले असता अमृता नदीवरील बंधाऱ्यात वैष्णवीचा मृतदेह व त्यांची मोटारसायकल आढळून आली आहे.

 नदी व पुराचे पाणी वाहत असल्याने कृष्णा व त्यांचा मुलगा प्रथमेश यांचा शोध घेण्यात ग्रामस्थ व नातेवाईकांना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी बीड येथील फायरबिग्रेड पथकाला घटनास्थळी रवाना केले असून, हे पथक अमृता नदीवरील बंधाऱ्यात घोरपडे पिता पुत्रांचा शोध घेत आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार अभय जोशी, मंडळ अधिकारी अंगद काशिद हे तळ ठोकून आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close