ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर

बीड – नुकतेच बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 704 ग्रामपंचायातींसाठी निवडणूक होऊन सरपंच आणि सदस्यांची निवड करण्यात आली. त्यापाठोपाठ आता उपसरपंच निवडीचाही कार्यक्रम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत उपसरपंच निवडता येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी दि.23 काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे की, निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची नवनिर्वाचीत सदस्यांची पहिली सभा घेणे व त्या सभेमध्ये उपसरपंचाची निवड करणे आवश्यक आहे. त्याकरिता ज्या ग्रामपंचायतींची मुदत दि 26 डिसेंबर 2022 पर्यंत संपणार आहे अशा ग्रामपंचायतींसाठी दि 28 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांच्या पहिल्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच,27 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांच्या पहिल्या सभेचे आयोजन मुदत समाप्तीच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या पहिल्या सभेचे सरपंचाच्या अध्यक्षतेखाली आयोजन करणे व सदर सभेमध्ये उपसरपंच याची निवड करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर आहे.