क्रीडा व मनोरंजन

प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सेवागौरव समारंभ

सिने अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती.

 बीड — सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा सुप्रसिध्द् लेखिका डॉ.दीपा क्षीरसागर 31 डिसेंबर 2022 रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवेचा यथोचित सन्मान आणि गौरव व्हावा या उद्देशाने दि.27 व 28 डिसेंबर रोजी सेवागौरव व साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजता उद्घाटन समारंभ व गौरव ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होईल. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून  सुप्रसिध्द् सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मा.जयदत्त (अण्णा) क्षीरसागर असणार आहेत.तर न.शि.सं.राजुरी नवगणचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उत्सवमुर्ती प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, सुप्रसिध्द् साहित्यिक तथा उदगीर येथे संपन्न झालेल्या 95 व्या अ.भा.म.सा.संमेलनाचे अध्यक्ष डॉ.भारत सासणे, युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सेवागौरव समारंभ आणि साहित्य महोत्सव असे दुहेरी स्वरूप असलेला हा समारंभ रसिक श्रोत्यांचे आकर्षण ठरणार आहे. उद्घाटन कार्यक्रमामध्ये दीपस्तंभ या प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार्‍या गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. उद्घाटन कार्यक्रमानंतर सायंकाळी 7.00 वाजता अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बहुचर्चित नरहर कुरूंदकर ( एका विचारवंताची अपरिचित गोष्ट ) या साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
सेवागौरव समारंभाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल. सकाळी 11.00 वाजता स्व.केशरबाई क्षीरसागर ऊर्फ काकू यांची शैक्षणिक दूरदृष्टी, वारसा आणि प्राचार्य डॉ.दीपाताई क्षीरसागर यांचे कार्य या विषयावर सुप्रसिध्द् सामाजिक कार्यकर्ते श्री.दगडू लोमटे यांचे व्याख्यान संपन्न होईल.बलभीम महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ.विद्यासागर पाटांगणकर या व्याख्यानाचे अध्यक्ष असतील. दुपारी 12.00 वाजता बीड जिल्हयातील स्थलांतरीत कामगारांच्या मुलांची शैक्षणिक स्थितीगती या विषयावरील परिसंवाद संपन्न होईल. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द साहित्यिक डॉ.भारत सासणे असतील. तर प्रा.डॉ.अरूंधती पाटील आणि शांतीवन प्रकल्प आर्वीचे संस्थापक श्री.दीपक नागरगोजे या परिसंवादत मार्गदर्शन करतील. दुपारी 1.00 वाजता निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन होणार असून सुप्रसिध्द कवी तथा गीतकार डॉ.दासू वैद्य हे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर डॉ.समाधान इंगळे कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करतील. सायंकाळी 5.00 वाजता मुख्य सेवागौरव समारंभ संपन्न होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द् सिनेपटकथा लेखक अरविंद जगताप यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयामध्ये प्रदर्शन व विक्री या तत्वावर विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची दुकाने उघडण्यात येणार आहेत. साहित्यास्वाद, कलास्वाद, लेखन,वाचन, मनन,चिंतन या अंगाने हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच ठरणार आहे.के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button