मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते फडणवीसांच्या प्रमूख उपस्थितीत ऊसाची पेटणार होळी

बीड — गेल्या 25 महिन्यापासून शेतात उभ्या असलेल्या ऊसाची मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शूभ हस्ते होळी करण्याचा कार्यक्रम माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 26 डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमास नाविलाजास्तव सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
माजलगाव तालुक्यातील आनंदगांव या ठिकाणी 26 डिसेंबर 2022 रोजी दुपारी एक वाजता 25 महिन्यापासून शेतात उभा असलेल्या उसाची होळी पेटवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हा ऊस पेटवला जाणार असल्याची पत्रिका सध्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखर आयुक्त शेखर गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून बीडचे जिल्हाधिकारी तसेच जय महेश ग्रुपचे प्रमुख प्रभाकर मांडवा हे उपस्थित राहणार आहेत.अन्यायग्रस्त शेतकरी गंगाभिषण थावरे आणि संग्राम गंगाधर थावरे या दोघांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.गेल्या पंचवीस महिन्यापासून शेतात ऊस उभा असल्याने आणि जय महेश शुगर इंडस्ट्री पवारवाडी यांनी केलेल्या द्वेषापोटी जवळपास पंधरा शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याने जाणीवपूर्वक नेला नाही.परिणामी शेतकऱ्यांचे यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र आता हे नुकसान सहन करण्यास आम्ही तयार असून हा ऊस 25 महिन्यापासून शेतात उभा असल्याने उसाची होळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी मान्यवर आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी नेते गंगाभिषन थावरे आणि अन्यायग्रस्त शेतकरी म्हणून संग्राम गंगाभिषन थावरे यांनी हे आवाहन केले आहे. या पत्रीकेमूळे सध्या जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी साखर आयुक्त हे हजर राहणार का? यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.