ताज्या घडामोडी

ग्रा.पं.निवडणूकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; 670 ग्रा.पं.साठी रविवारी मतदान, सरपंच पदासाठी 1932 तर सदस्य पदासाठी 12 हजार 219 उमेदवार

बीड — जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायती पैकी 34 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 670 ग्रा.पं.साठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर सदस्य पदाच्या 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत.दरम्यान ग्रा.पं.निवडणूकीच्या प्रचार तोफा आज दि.16 डिसेंबर रोजी सायंकाळी थंडावल्या आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाकडून जाहीर झाला. जिल्ह्यात निवडणूकीपुर्वी 34 ग्रा.पं.पुर्ण बिनविरोध निवडून आल्याने आता उर्वरित 670 ग्रा.पं.च्या सरपंच आणि सदस्य पदासाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. 20 डिसेंबरला मत मोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने गावोगावी सर्वच राजकीय पक्ष पुरस्कृत पॅनल प्रमुखांकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु होता.

मतदानादिवशी जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यातील 670 ग्रा.पं.साठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त मागवला आहे.
बीड जिल्ह्यात काही ग्रामपंचायती अतिसंवेदनशील आहेत. त्याठिकाणी बुथ कॅप्चरींगसारख्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व पोलिस यासाठी कामाला लागले आहेत. मात्र ऐनवेळी काही प्रसंग उद्भवला तर जास्तीचा फौजफाटा आपल्याकडे असावा या उद्देशाने पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बाहेरून 500 होमगार्ड आणि 500 पोलिस मागवले आहेत. त्याचबरोबर 200 एसआरपीचे जवान बीडमध्ये बंदोबस्ताकामी येणार आहेत. याशिवाय बीडचे 600 होमगार्ड आणि जिल्हा पोलिस दल निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी तैनात आहे. जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद येथील 500 पोलिस आणि 500 होमगार्ड यासह 100 जवानांची एक तुकडी एसआरपीच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखल होत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button