ताज्या घडामोडी

पत्नीच्या सरपंचपदासाठी घेतलेल्या प्रचारसभेत भाषण संपवून खूर्चीवर बसताच पतीने सोडला प्राण

लातूर — सध्या ग्राम पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गावागावात प्रचारसभा पाहायला मिळत आहेत.. अशातच एक दुर्दैवी बातमी लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्राम पंचायतीतून समोर आली आहे.ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण संपवून खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीचा स्टेजवर मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने ही व्यक्ती दगावली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव अमर नाडे असं आहे. ते मुरुड परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अमर यांची पत्नी अमृता नाडे ह्या सरपंच पदाच्या उमेदवार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पतीच्या मृत्यूने अमृता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जातेय.

प्रचाराच्या सभेत अमर नाडे यांनी आपलं भाषण केलं. मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर ते स्टेजवर असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. पण अचानक त्यांनी छातीत दुखून लागलं. त्याबाबत त्यांनी शेजारीच बसलेल्या आपल्या पत्नीलाही सांगितलं. पण काही कळायच्या आतच ते खुर्चीवरुन खाली कोसळले.
स्टेजवरच खुर्चीवरुन खाली कोसळललेल्या अमर नाडे यांच्या मदतीसाठी सगळेजण तातडीने धावले. अमर नाडे यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.अमर नाडे यांच्या मृत्यूने मुरुडसह लातूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मुरुड ही लातूर जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्राम पंचायत असून यामध्ये 18 सदस्य संख्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमर नाडे यांचे चुलते दिलीप नाडे यांच्याकडे पंचायतीची सत्ता आहे. ही सत्ता बदलण्यासाठी अमर यांनी स्वतः पुढाकार घेत मुरुड परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.त्यांच्या पत्नी अमृता नाडे या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. मयत अमर यांच्या पश्चात पत्नीसह एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अगदी वयाच्या 43व्या वर्षी असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button