ऊस तोडणी सुरू असताना सापडला मानवी सांगाडा

माजलगाव — ऊस तोडणी करीत असताना विखुरलेल्या अवस्थेतील मानवी सांगाडा सापडल्याची घटना रामपिंपळगाव शिवारात बूधवार दि.14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली दरम्यान, चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका 63 वर्षीय व्यक्तीचा हा सांगाडा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तालुक्यातील रामपिंपळगाव शिवारात आबासाहेब चाळक यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. या दरम्यान आज सकाळी मजुरांना उसाच्या पाचटात मानवी कवटी आढळून आली. घाबरलेल्या मजुरांनी हि बाब शेतमालकास सांगितली. याची कल्पना पोलिसांना देण्यात आली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत. पाहणी करत इतर अवयव शोधून काढले. त्याचबरोबर कपडे आणि चप्पलही सापडली.दरम्यान, पोलिसांना 25 ऑगस्ट 2022 रोजी राधाकिसन बाबुराव जगदाळे वय 63 वर्ष, रा.हरकीलिमगाव या बेपत्ता व्यक्तीशी साम्य आढळून आले. पोलिसांनी जगधने यांच्या नातेवाईकांना बोलावून सांगाडा , कपडे, चप्पल दाखवले. यावरून सांगाडा राधाकिसन बाबुराव जगदाळे यांचा असल्याचे त्यांचा मुलगा तुळशीराम राधाकिसन जगदाळे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी सांगाडा अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश ईधाते, पोलीस शिपाई विलास खराडे करत आहेत.