राजकीय

चौसाळकरांनो मूर्ख किती बनायचं हे आपणच ठरवायचं? झुंडशाहीला निवडायचं की धनशक्तीला?की “जनशक्ती “ला आपलंसं करायचं ?

बीड — चौसाळा शहराचा विकास खिळखिळा करत स्वतःचं आणि भोवतालच्या कोंडाळ्याच हितच ज्याने बघितलं तो प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी नसला तरी त्याचे बगलबच्चे युवकांच्या टोळीत सहभागी होऊन पुन्हा जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत. दुसरीकडे धन दांडगे जिल्हा परिषद, पंचायत समिती ग्रामपंचायत आपल्याच घरात असावी यासाठी धडपड करत राजकीय समीकरणं मांडू लागली आहेत.बीडहून गाव कारभार हाकण्याची त्यांनी तयारी केली जे गावातच राहत नाहीत त्यांना गावच्या समस्या कळणार कशा? समस्या घेऊन बीडला त्यांच्या दारात जायचं काय? गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मग न्याय कसा मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे धनशक्ती, झुंड शक्ती विरोधात जनशक्ती असा संघर्ष ग्रामपंचायत आखाड्यात पेटला आहे.

विशिष्ट पक्षाशी एकनिष्ठता असल्याने चौसाळा शहर व परिसरातील जनतेने नेहमीच या व्यक्तीवर विश्वास ठेवला. पण जनतेसोबत विश्वासघात करताना कुठलीच कमी ठेवली नाही. शहराचा विकास कधी केलाच नाही. स्वतःच आणि बगलबच्चांचं भलं एवढ्यासाठीच गाव कारभाराची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. सुडाचा राजकारण करत असताना झुंडशाहीला मोकळीक दिली. विकासाला खीळ बसली नांदूर, नेकनूर सारखी गाव बाजारपेठेच्या दृष्टीने असेल किंवा शैक्षणिक दृष्ट्या असेल पुढे गेली पण चौसाळा घाणीच्या साम्राज्यात बुडाली.घाणेरडं राजकारण चौसाळा शहराचा उकिरडा बनवून गेलं. झुंडशाहीमुळे गावातील एकोपा रसातळाला गेला.यातून महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला. तरी प्रत्येक वेळी बाजू घेतली गेली ती आपल्या बगलबच्चांची यातून बाजारपेठेचा विकास खुंटला. मात्र आता जनाची नाही पण मनाची लाज वाटली गाव कारभाराची सूत्र आपल्या हाती असूनही आता कुठल्या तोंडाने जनतेसमोर जायचं म्हणून जगदाक्षायणी अलिप्ततावाद स्वीकारला पण पाण्यात जसा बगळा एका पायावर तपश्चर्या करताना दिसतो पण त्याचं सर्व लक्ष हे पाण्यातील माशावर असतं अगदी तशीच खेळी या राजकीय नेत्यांने केली आहे. आपले बगलबच्च्यांची युवकांची फळी उभी करून त्यांना निवडून आणायचं ‘ क्रांती’चा नारा द्यायचा अन पुन्हा सूत्र आपल्याच हाती ठेवायची. मी गावच्या राजकारणातून अलिप्त आहे असं दाखवत हळूच गाव कारभाराच्या सत्तेचा मासा पकडायचा असा डाव आखला गेला आहे. याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुजान मतदारांमध्ये असल्याचं दिसू लागला आहे.

दुसरीकडे ज्यांनी कधी कोणत्याच पक्षाशी, विचारांशी एकनिष्ठता बाळगली नाही. पैशाच्या जोरावर राजकारण करता येत. मतदारांनाही तालावर नाचवता येत हे माहित असल्यामुळे जिल्हा परिषद असो की पंचायत समिती, ग्रामपंचायत असो आपल्याच ताब्यात राहावी स्वतःची राजकीय पोळी भाजली जावी. एवढीच एकमेव इच्छा बाळगत परिवर्तनाची लढाई आम्ही करत असल्याची आवई उठवली गेली आहे. पण मतदारही सुज्ञ आहे. जे चौसाळा शहरातच राहत नाहीत ते शहराची समस्या कशी अनुभवू शकतात. ज्या समस्येचा अनुभव नाही ती समस्या हे सोडवणार कशी? बीडमध्ये राहून गांव कारभार हाकला जाणार असेल तर चिल्लर कामाला देखील गोरगरिबांना स्वतःचा पैसा खर्च करून बीडला यांच्या दारात जावं लागेल. मोठे व्यावसायिक असल्याने त्यांची भेट घरी गेल्यावर तरी होईल याची शाश्वती नाही. या मंडळींनी मनात आणलं असतं तर चौसाळा शहराचा कायापालट झाला असता पण फक्त आणि फक्त स्वार्थासाठी इथल्या जनतेच्या भावनेचा त्यांच्या मतांचा वापरच यांनी केला. प्रत्येक पक्षाशी राजकीय विचारांशी धोकेबाजी केली ते जनतेबरोबर प्रामाणिक कसे राहणार? असे प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत. एरवी अल्पसंख्यांकांना न विचारणारी ही मंडळी अल्पसंख्यांकाच्या जोरावर शहराच्या कारभाराची सूत्र हाती घेण्याची स्वप्न पाहत आहेत. पण त्यांनी पाहिलेलं स्वप्न जर प्रत्यक्षात उतरलं तर मात्र गोरगरिबं अल्पसंख्यांक समाजाला कोणीच वाली राहणार नाही. प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी बीडच्या घराचे उंबरे स्वतःचा पैसा खर्चून झिजवावे लागतील हे निश्चित आहे. “गाव बकाल, आपण मालामाल”ही व्यापारी नीती मतदारांच्या लक्षात येण्याची गरज निर्माण झाली आहे. जुनाट मतलबी विचारांची साथ सोडून खंबीर हात हातात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे सर्वच जाती-धर्माच्या जनतेला विश्वासात घेणारं नव नेतृत्व उदयाला येण्याची गरज निर्माण झाली आहे. गोरगरिबांची पाठराखण होण्यासोबतच गावच्या विकासाला चालना मिळावी यासाठी मतदारांना आपल्या “जनशक्ती” वर विश्वास ठेवावाच लागेल त्यातूनच चौसाळा शहराच्या विकासाची नवी पहाट उदयाला येणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button