ताज्या घडामोडी

चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झालेल्या तिघांना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

पिंपरी — कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर चिंचवड येथे शाई फेकल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांवर खूनाचा प्रयत्न केला यासारख्या गंभीर कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश पिंपरी न्यायालयाने दिला.

समता सैनिक दलाचा संघटक मनोज भास्कर घरबडे वय 34 वर्ष,रा. पिंपरी, सदस्य धनंजय भाऊसाहेब इजगज वय 29वर्षे, रा. आनंदनगर, चिंचवड, वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ वय 40 वर्ष, रा. आनंदनगर, चिंचवड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पैठण येथील एका कार्यक्रमात पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर ते शनिवारी दि.10 डिसेंबर रोजी श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी चिंचवडगाव येथे आले होते. उद्घाटनापूर्वी भाजप कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. तेथून बाहेर पडत असतानाच त्यांच्या अंगावर शाई फेकली होती. पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली होती.

या कलमांतर्गत कारवाई
भारतीय दंड संहिता कलम 307 , खुनाचा प्रयत्न, कलम 353 लोकसेवकाचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी प्राणघातक हल्ला, कलम 355 ,इच्छापूर्वक दुखापत पोचवण्याचा उद्देश, कलम 294 कपटपूर्ण वापर करणे, तीन वर्ष कारावास, कलम 501,अब्रुनुकसानकारक व बदनामी संदर्भात कृत्य, कलम 120 बी,गुन्ह्याबाबत षडयंत्र, कलम 34 गुन्ह्याची कृती करून उद्देश साध्य करणे, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) (3), जाहीरपणे प्रक्षोभक किंवा असभ्य वर्तन या कलमांतर्गत तिघांवर कारवाई झाली आहे.

तीन अधिकाऱ्यांसह 10 पोलिस निलंबित
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले तीन अधिकारी व सात कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबित केले. यामध्ये निरीक्षक सतीश नांदुरकर, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने, सहायक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, हवालदार प्रमोद वेताळ, नाईक देवा राऊत, सागर अवसरे, कांचन घवले, प्रियांका गुजर यांचा समावेश आहे. कामात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. दरम्यान, पोलिसांवर कारवाई करू नये, असे आवाहन पाटील यांनी केल्यानंतरही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिस दलात मात्र खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपींच्या वतीने प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केस लढवणार असल्याचं जाहीर केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button