क्राईम

जेलमधून सुटताच सुरू केली गांजा तस्करी; नेकनूर मध्ये 11 किलो गांजा पकडला

बीड — आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील एका शेतकर्‍याने कापसाच्या पिकात गांजाची जाडे लावली होती. यावर पोलिसांनी कारवाई केली. या घटनेला कांही तासांचा अवधी उलटत नाही तोच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजावर दुसरी कारवाई झाली. दाम्पत्याने घरात गांजा साठवून ठेवला होता त्याठिकाणी एलसीबीने धाड टाकून पत्नीला ताब्यात घेतले मात्र पती फरार झाला. पती हा एमपीडीए कारवाईनंतर कारागृहातून सुटला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने गांजा विक्रीला सुरुवात केली होती. या प्रकरणी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबन शामराव पवार व सत्यभामा बबन पवार रा.नेकनूर अशी आरोपी दाम्पत्याची नावे आहेत. बबन पवार याच्यावर हातभट्टी दारु बनविणे, विक्री करणे, जवळ बाळगणे यासारखे पाच गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर एमपीडीए नुसार कारवाईचा प्रस्ताव नेकनूर पोलिसांनी 30 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षकांना पाठवला. पोलिस अधीक्षकांकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.14 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानंतर त्याच दिवशी बबन पवारला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात स्थानबध्द केले होते. दरम्यान, एमपीडीएनुसार कारवाई केल्यावर गृहविभागाकडून 12 दिवसांच्या आत मान्यता घ्यावी लागते. जिल्हाधिकार्‍यांनी 16 नोव्हेंबरला दिलेला प्रस्ताव गृहविभागाने फेटाळला. कक्षाधिकारी देवेंद्र चंदेल यांनी प्रस्ताव अमान्य करत बबन पवारची स्थानबध्दतेतून सुटका करण्याचे आदेश 26 नोव्हेंबरला दिले. 6 डिसेंबरला बबन पवार कारागृहाबाहेर आला, त्यामुळे प्रशासनावर नामुष्की ओढावली होती.दरम्यान कारागृहातून सुटताच बबन पवारने गांजाच्या धंद्यात प्रवेश केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. एलसीबीने टाकलेल्या धाडीत पत्र्याच्या शेडमधील एका खाटेखाली निळ्या रंगाच्या बॅगेत एक लाख 16 हजार 690 रुपये किमतीचा 11 किलो 669 ग्रॅम गांजा आढळून आला. तो जप्त केला असून सत्यभामा पवार हिस ताब्यात घेण्यात आले आहे तर बबन पवार हा फरार आहे. त्या दोघांवर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली 10 डिसेंबर रोजी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, सहा. उपनिरीक्षक वचिष्ठ कांगणे, संजय जायभाये, हवालदार कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, अशोक दुबाले, सतीश कातखडे, नसीर शेख, गणेश मराडे, देवीदास जमदाडे, शुभांगी खरात यांच्या पथकासोबत नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button