चौसाळ्याच्या विकासाला खिळ घालणारी धनशक्ती यावेळी प्रभावी ठरणार की जनशक्ती ?

बीड — बाजारपेठ असो की गावचा विकास असो किंवा सर्वसामान्य जनतेचे रोजचे प्रश्न असो केवळ नेतृत्व व्यवस्थित न मिळाल्यामुळे जैसे थेच स्थिती आजही आहे. मागास असलेली गाव देखील प्रगती करून नावारूपाला आली पण चौसाळ्याचा विकास कधी झालाच नाही. प्रत्येक वेळी धन दांडग्यांनी आपले मक्तेदारी कायम ठेवत विकासाची गाडी पुढे जाऊच दिली नाही. या निवडणुकीत तरी धन दांडग्या विरोधात जनशक्ती आपला प्रभाव दाखवून जनता विकासाची वाट धरेल का? हे होऊ घातलेल्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
्चौसाळा शहराच्या विकासाचा,बाजार तळाचा प्रश्न असो अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न असो,स्वच्छतेचा प्रश्न असो तो कसा कायम राहील याकडेच आज पर्यंतच्या गाव कारभाऱ्यांनी लक्ष दिले. निवडणुकीत प्रत्येक वेळी धनाचा वापर केला की यश हमखास मिळणार याची खात्री असल्यामुळे गाव कारभाऱ्यांनी (पुढारी) फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच जनतेचा वापर केला गेला,हीच पोळी भाजून घेण्यासाठी जनमत आमच्याच सोबत अस सांगत वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी जवळीक साधली. यात जनता कुठेच नव्हती या गाव पुढाऱ्यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत गेली पण शहराची अवस्था मात्र बकाल झाली. या हालाखीची जबाबदारी यांनी कधी घेतली नाही. त्यासाठी जनसामान्यात अंधश्रद्धेचे पिल्लू सोडून दिलं. “फकीराची पांढर”असल्यामुळे इथल्या जनतेचं उत्पन्न वाढत नाही. वाढलच तर ते जवळ टिकत नाही. त्यामुळे गावचा विकास झाला नाही हे म्हणायला ते पुन्हा मोकळे झाले.मग प्रश्न असा पडतो की गावाला पैशाच्या तालावर नाचायला लावणाऱ्या धन दांडग्याची संपत्ती दिवसेंदिवस कशी वाढत आहे. अन् सर्वसामान्य रोजच्या प्रश्नात कसा गुरफटला आहे? ही खेळी आता तरी चौसाळ्याच्या जनतेला समजून घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या धन दांडग्यांचा विकास म्हणजे गावचा विकास नाही हे लक्षात घेणं गरजेच आहे. निवडणूक काळातच जनशक्ती आपला प्रभाव दाखवू शकते. अशा लोकांना त्यांची जागा दाखवून योग्य, दूरदृष्टी असणाऱ्या सर्व समावेशक उमेदवाराला मतदान करून विकासाच्या वाटेवरून भरकटलेला गाडा पुन्हा वाटेवर आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अल्पसंख्यांक बहुसंख्यांक याचा विचार न करता जो अर्ध्या रात्री आपल्या कामाला पडू शकेल जो सत्याची बाजू धरेल जो गोरगरिबांच्या बाजूने उभा राहण्याची हिंमत करेल अशा योग्य उमेदवारालाच मतदार राजा निवडून देईल का ? पुन्हा क्षुल्लक कामासाठी दांडगांड्याच्या दारात हात जोडून लाचारासारखा उभा राहणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.