हजारेंच्या हजेरीने अवैध दारू धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले

बीड — सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी अवैध दारू धंद्याविरोधात मोहीम सुरू केली असून चार-पाच दिवसांपूर्वी चौसाळा परिसरातील हॉटेल, धाब्यावर अवैधरित्या विक्री होणारा दारू साठा जप्त केला होता. त्यानंतर आज बोरखेड व लिंबागणेश येथे हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून दारू नष्ट करण्यात आली व 44 हजार रुपयांचे रसायन जप्त करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षापासून नेकनूर पोलीस ठाण्यांतर्गत अवैध देशी विदेशी दारू धंद्यासोबतच हातभट्टीचा व्यवसाय देखील नावारूपाला आला होता. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या धंद्याविरोधात मोहीम उघडली आहे.या मोहिमे अंतर्गत साखरे बोरगाव येथे सरपंच धाब्यावर, चौसाळ्या जवळील महाराजा हॉटेल वर तसेच धोतरा शिवारातील हॉटेल वाडा या ठिकाणी धाड टाकून देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला.
त्यानंतर शनिवारी बोरखेड हद्दीतील शेर वस्तीवर श्रीहरी निवृत्ती पवार यांच्या हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकून 300 लिटर रसायन जप्त केले. तसेच लिंबागणेश येथील पार्वतीबाई आश्रुबा गायकवाड व जाईबाई रावण गायकवाड या दोन महिला गावठी दारू तयार करत असताना धाड मारली या ठिकाणी चारशे चारशे लिटर गुळ मिश्रित फसफसते रसायन मिळून आल्यानंतर नष्ट केले जवळपास या तिन्ही कारवाईत अकराशे लिटरचे रसायन पोलिसांच्या हाती सापडले त्याची किंमत 44 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 फ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोलीस उपनिरीक्षक पानपाटील, उपनिरीक्षक अनवणे पो.ह. नागरगोजे, क्षीरसागर, खांडेकर, डिडूळ अंभोरे यांनी केली.