ताज्या घडामोडी

अडीच वर्षांचा संघर्ष न्यायालयाने 4 तासात संपवला; पतीस 62 दिवसांची कोठडी

बीड – रीतसर फारकत घेतलेल्या एकाने आपल्या पत्नीस महिन्याकाठी पोटगी दिली नाही. परिणामी पत्नीने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अटक वॉरंट काढताच शिवाजीनगर पोलिसांनी दोन तासातच पतीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 62 दिवसासाठी कारागृहात पाठवले. कौटुंबिक न्यायालयाचे न्या. मकरंद अदवंत यांनी 6 डिसेंबरला हे आदेश दिले

कारागृहात पाठवण्यात आलेल्या आरोपीचे
शेख शारेब शेख सादेक (वय 31 वर्ष रा. शहेंशाहनगर, बीड असे नाव आहे. व्यवसायाने मेेकॅनिक असलेल्या शेख शारेब याने पत्नी निखत फातेमाशी फारकत घेतली होती. निखत फातेमा या कमावत्या नव्हत्या. गुजारा व्हावा यासाठी महिन्याकाठी शेख शारेब याने 2700 रुपये पोटगी द्यावी, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले होते. मात्र,31 महिन्यांपासून शेख शारेब हा पोटगी देत नव्हता. एकूण 84 हजार 500 रुपये त्याच्याकडे थकीत आहेत. दरम्यान, पोटगी मिळावी, यासाठी निखत फातेमा यांनी कौटुंबिक न्यायालयाचे दार ठोठावले होते.
या दरम्यान, वेळोवेळी न्यायालयाने त्यास वॉरंट बजावणी केली, परंतु त्याने दुर्लक्ष केले. न्यायालयीन सुनावणीवेळी तो हजर राहत नसे. अखेर 6 डिसेंबरला न्या. मकरंद अदवंत यांनी त्याच्याविरुध्द अटक वॉरंट जारी केले. दरम्यान, निखत फातेमा या आपल्या आईसोबत 6 डिसेंबरला शिवाजीनगर ठाण्यात कैफियत घेऊन आल्या. त्यानंतर पो. नि. केतन राठोड यांनी अंमलदार आस्तीक लादेक व विकास कांदे यांना रवाना केले. या दोघांनी तपासचक्रे गतिमान करून शेख शारेब यास शहेंशाह नगरमधून ताब्यात घेतले. त्यास लगेचच कौटुंबिक न्यायालयात हजर केले. न्या. मकरंद अदवंत यांनी त्यास 62 दिवस कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
अडीच वर्षांच्या संघर्षाचा चार तासांत न्याय
शेख शारेब हा अडीच वर्षांपासून पत्नीला पोटगी देत नव्हता. न्यायालयीन नोटीस व वॉरंटकडेही तो दुर्लक्ष करत असे. 6 डिसेंबरला न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यावर निखत फातेमा या आईसमवेत पोलीस ठाण्यात आल्या. शिवाजीनगर ठाण्याचे पो. नि. केतन राठोड यांनी त्यांची कैफियत जाणून घेत धीर देण्याचा प्रयत्न केला; त्यानंतर दोन अंमलदारांना रवाना करून न्यायालयात हजर केले. त्यामुळे अडीच वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या निखत फातेमाला अवघ्या चार तासांत न्याय मिळाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button