अवघ्या १० वर्षांत ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष

नवी दिल्ली — दिल्ली महानगरपालिकेत भाजपची सत्ता उलथवून टाकणारा आम आदमी पक्ष हा आता देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांत मात्र निराशा मिळाली आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यादरम्यान ‘आप’ हा देशातील आठवा ‘राष्ट्रीय मान्यतेचा’ पक्ष बनला आहे. खुद्द आरविंद केजरीवाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमुळे आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. २०१३ मध्ये दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आप ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे १० वर्षांच्या आत पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.
आपचे गोव्यात दोन आमदार तसेच दिल्ली पंजाब आणि दिल्ली महानगरपालिकेत सत्ता आहे. केजरीवाल यांच्या पक्षाला गोव्यात ६.७७ टक्के मते मिळाली होती. तर गुजरातमधील निवडणुकीत आम आदमी पक्षाला १३ टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे आपला देशातील चार राज्यांमध्ये ६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे पक्षाला राष्ट्रीय म्हणून मान्यता मिळाली आहे.
देशातील सध्याचे राष्ट्रीय पक्ष
देशात सध्या भाजप, काँग्रेस, बसपा, माकप, भाकप, राष्ट्रवादी आणि तृणमूल कॉंग्रेस आणि आप असे एकूण आठ राष्ट्रीय पक्ष आहेत. सध्या देशात राष्ट्रीय, राज्य आणि प्रादेशिक पक्ष अशी वर्गवारी आहे. देशात याआधी ७ राष्ट्रीय, ३५ राज्यस्तरीय पक्ष आणि ३५० प्रादेशिक पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला तीनपैकी एक अट पूर्ण करावी लागते.
राष्ट्रीय पक्ष होण्याच्या अटी
✿ किमान तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत संबंधित पक्षाने २ टक्के जागा जिंकल्या पाहिजेत.
✿ लोकसभेच्या चार जागांच्या व्यतिरिक्त, पक्षाला लोकसभेत किमान ६ टक्के मते किंवा विधानसभा निवडणुकीत ४ टक्के किंवा अधिक राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळाली पाहिजेत.
✿ पक्षाला चार किंवा अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली पाहिजे.