शर्मांच्या कार्यालयाबाहेर लोकशाहीचा आज मुडदा पडला; घरकुलाच्या न्याय मागणीसाठी अप्पारावने प्राण सोडला

बीड — गेल्या पंचवीस वर्षापासून घरकुलाच्या मागणीसाठी संघर्ष करीत असलेल्या आप्पाराव पवार यांचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने प्रशासनाविरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली असून त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सुरू केला दरम्यान मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
बीडचं जिल्हा प्रशासन सध्या नाकर्तेपणासाठी नावारूपाला येऊ लागला आहे. भ्रष्टाचारी,धन दांडगे, भू माफिया, टँकर माफिया यांना पायघड्या घालत आहे तर दुसरीकडे न्याय मागण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या दारात सर्वसामान्य जनतेला प्राण सोडावा लागत आहे असं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. इंग्रजही आंदोलनाला थोडीफार किंमत देत होते मात्र पावलोपावली सध्याचे अधिकारी शरमा सोडून लोकशाहीचा मुडदा पाडत असल्याचं दिसू लागला आहे. मंजूर असलेल्या घरकुलाला जागा उपलब्ध करून द्यावी या न्याय मागणीसाठी पारधी समाजाचे आप्पाराव पवार आपल्या कुटुंब कबिल्यासह जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसले होते. घरकुलाच्या न्याय मागणीसाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी ते गेल्या 25 वर्षापासून संघर्ष करत आहेत प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत.मात्र प्रचंड संघर्षानंतरही त्यांच्या वाट्याला निराशाच आली.जिल्हा प्रशासनाने इथेही नाकर्तेपणा दाखवत उपोषणाची दखल घेतली नाही. शेवटी आप्पाराव पवार यांची आंदोलन स्थळी रात्रीच्या वेळी प्राणज्योत मालवली.रविवारी सकाळी ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात आली एकच आक्रोश सुरू झाला. रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यात मग्न असलेले अधिकारी एवढी मोठी घटना घडूनही घटनास्थळी यायला टाळाटाळ करू लागले. मात्र जिल्हाभरात प्रशासना विरोधात संतापाची लाट निर्माण झाल्यानंतर धावाधाव केल्या गेली. शेवटी पोलीस प्रशासनाचा महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर हजर झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. मात्र जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका आप्पाराव पवार यांच्या कुटुंबीयांनी घेतली. दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक केशव राठोड यांनी सोमवार दिनांक पाच डिसेंबर रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रेत हलवण्यास नातेवाईकांनी परवानगी दिली. दरम्यान या घटनेने जिल्हा प्रशासना विरोधात संतप्त भावना निर्माण होऊ लागल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अप्पाराव पवार यांचा बळी गेला असून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसलेल्या माणसाचा मृत्यू म्हणजे जिल्हा प्रशासनाने लोकशाहीचा केलेला खून आहे
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, सामाजिक कार्यकर्ते
आप्पासाहेब पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्या विरोधात कारवाई करावी दोषीवर गुन्हे दाखल करावेत, पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास पप्पू जी कागदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर आंदोलन करण्यात येतील
किशन तांगडे
रिपाई तालुका अध्यक्ष बीड