आरोग्य व शिक्षण

बीड जिल्हा हा मागासलेला नाही तर अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे – प्रा.प्रदिप रोडे

नालंदा करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा बॅचचा उत्साहामध्ये शुभारंभ

बीड —. बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा नाही तर बीड जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे असे मत नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी व्यक्त केले ते नालंदा फाउंडेशन बीड अंतर्गत नालंदा करियर अकॅडमी स्पर्धा परीक्षा बॅचचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तुलसी आय.टी कॉलेज येथे स्पर्धा परीक्षा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा फाउंडेशनचे बीडचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.रवींद्र कोलप (निवृत्त अध्यक्ष अभियंता महावितरण, बीड), मा.संदीप उपरे (राज्याध्यक्ष,सत्यशोधक ओ.बी.सी परिषद, महाराष्ट्र राज्य),प्राचार्य.डॉ. पांडुरंग सुतार (जीवनदीप महाविद्यालय,पिंपळनेर),प्रा.डॉ. भिष्मा रासकर (निवृत्त प्राध्यापक, बीड), करनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विशाल नवले,प्रा.डॉ.नंदकुमार उघाडे,प्रा.सुमित वाघमारे यांच्या सह स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये असल्यास यशाला सहज गवसणी घालता येते. कुठल्याही गोष्टीसाठी शंभर टक्के मेहनत घेतल्यास ती आपणास नक्की मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत घेणे गरजेचे आहे असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.नालंदा फाउंडेशन,बीडच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये स्पर्धा परीक्षेची बॅच सुरू करण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांनी केलेल्या कार्याची प्रेरणा देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा नाही तर बीड जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी करनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विशाल मुरलीधर नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कुठली पुस्तक वाचली पाहिजे, किती तास अभ्यास करणे गरजेचे आहे.मानसिक व शारीरिक समतोल व्यवस्थित राखण्यासाठी व्यायाम किती महत्वाचा आहे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.तसेच एमपीएससी, यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्लॅन तयार करणे किती महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.आपण किती तास अध्ययन करतो आणि त्यातून आपल्याला किती आकलन होते हे तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.नुसता अठरा तास अभ्यास करून उपयोग नाही तर त्यासाठी आकलन शक्ती वाढविणे देखील अतिशय महत्वाचे असल्याचे नवले यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अंकुश कोरडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.पांडुरंग सुतार यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button