आपला जिल्हा

अश्लील मेसेज पाठवल्या प्रकरणी भाजपा आमदारांसह तिघां विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबादजुन्या कौटुंबिक वादाचा राग मनात ठेवत एका तरुणीला हाताशी धरले व आपल्याच भाच्याला अश्लील संदेश पाठवून त्रास दिल्याप्रकरणी बदनापूरचे आमदार नारायण कुचे, त्यांचा भाऊ देविदास कुचे आणि अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या संबंधित तरुणीविरोधात जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलिसात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे याप्रकरणी पीडित भाच्याने चंदनझिरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्यांनी दखल न घेतल्याने भाच्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. तेव्हा सुनावणीदरम्यान न्या. तानाजी व्ही. नलावडे व न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने संबंधित भाचा दीपक डोंगरे यांच्या २ मार्च रोजीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. डोंगरे हे व्यवसायानिमित्त सख्खे मामा आमदार नारायण कुचे यांच्याकडे वास्तव्यास होते. डोंगरेंनी कुचे यांना ४० लाख रुपये निवडणुकीसाठी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुचे परिवाराने त्यांच्या मुलीशी डोंगरे यांचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो डोंगरेंसह त्यांच्या नातेवाइकांना मान्य होता. यातून कुचे परिवारातील मुलीशी डोंगरे यांचे प्रेम जुळले. डोंगरेंनी पैशांच्या मागणीसंदर्भात संपर्क केला असता, आमदार नारायण कुचे यांना प्रेमप्रकरणाविषयी समजले. दरम्यान, कुचे यांचा राग अनावर होऊन त्यांनी कंत्राटाचे प्रमाणपत्र रद्द करून काळ्या यादीत टाकतो, काटा काढतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच आमदार कुचे यांच्यासह त्यांचे बंधू देविदास कुचे यांनी आपणाविरोधात षडयंत्र रचून एका तरुणीस आपणास अश्‍लील संदेश पाठविण्यास सांगत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचेही नमूद केले आहे. 

सुनावणीदरम्यान तरुणीचा जबाब याचिकाकर्त्यातर्फे रवींद्र गोरे यांच्यातर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. सुनावणीअंती डोंगरे यांनी दोन मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. खंडपीठाच्या आदेशानुसार आमदार नारायण कुचे, त्यांचे बंधू देविदास कुचे व संबंधित युवतीविरोधात चंदनझिरा पोलिसात भादंवि कलम २९४, ५०७, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे रवींद्र गोरे यांनी काम पाहिले. ॲड. गोरे यांना चंद्रकांत बोडखे यांनी साहाय्य केले. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close