देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजपाचे आ. सुरेश धस यांच्यासह पत्नी व भावावर गुन्हा दाखल

बीड– हिंदू देवस्थान जमिनीचे बनावट कागदपत्राधारे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता सुरेश धस ,भाऊ देविदास रामचंद्र धस तसेच मनोज रत्नपारखी व असलम नवाब खान यांच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते राम सूर्यभान खाडे (रा.करेवाडी ता. आष्टी) यांनी हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश 18 ऑक्टोबर रोजी लाच लुपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. राम खाडे यांच्या तक्रारीत आमदार सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख असल्याने सुरेश धस यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवतआ. सुरेश धस यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, तक्रारदार राम खाडे यांची 13 जानेवारी 2022 ची तक्रारच एफआयआर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्यानुसार मंगळवार दि. 29 नोव्हेंबर रोजी कलम 13 (1) (अ) (ब), 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सह कलम-
420,465,467,468,471,
120 (ब)109 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.
आमदार सुरेश धस यांच्यावर असा आहे आरोप
आमदार धस यांनी पदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत,असे भासविले. देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली असा ठपका ठेवण्यात आला आहे.