जिल्हाधिकारी, भ्रष्ट अधिकारी भाऊ भाऊ !जनतेला लुटून खाऊ! डॉ. ढवळेंच्या थाळीचा नाद प्रशासनाला ऐकू जाणार का?

बीड — पुरवठा विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी समाजसेवक डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन केले. थाळीचा नाद जिल्हाधिकारी यांच्या काना पर्यंत पोहोचून पाच हजार राशन कार्डचा काळाबाजार, टीपीवर बोगस सह्या, बनावट उत्पन्न प्रमाणपत्र आधारे डाटा एन्ट्री, धान्याचा काळाबाजार यासारख्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्या विरोधात कारवाई करणार का? जिल्हाधिकारी नेहमीसारखं खंबीरपणाने भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार का? जनतेला न्याय मिळणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पुरवठा विभागातून पाच हजार रेशन कार्ड गायब झाले. चौकशीचा बागुलबुवा उभा केला गेला पण अजून निष्पन्न काहीच झाले नाही. मस्तवाल अधिकाऱ्यांनी टीपीवर (ट्रांसफार्मर परमिट) बोगस सह्या घेऊन धान्य काळ्या बाजारात विकले. पुरवठादार व रेशन दुकानदार यांच्या संगनमताने ग्राहकांची होणारी आर्थिक लूट, चक्क बोगस प्रमाणपत्राचा आधार घेत डाटा एन्ट्री साठी होणारा वापर यासारख्या भ्रष्टाचारावर जिल्हाधिकारी पांघरून घालत आले आहेत. रेशन कार्ड घोटाळा प्रकरणी तर औरंगाबादचे उपयुक्त वामन कदम यांनी गुन्हे दाखल करण्याचे तब्बल पाच वेळा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देऊन देखील जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी भ्रष्टाचाऱ्याना अभयदान दिले.भ्रष्टाचारी व जिल्हाधिकारी भाऊ भाऊ दोघे मिळून मलिदा खाऊ अशी स्थिती निर्माण झाली आहे. या विरोधात तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी,विधवा,परित्यक्ता तसेच दिव्यांग यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा. या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर, बीड तालुका सचिव मुश्ताक शेख , शेख मुबीन बीडकर,सय्यद आबेद बीडकर ,बलभीम उबाळे, जिल्हाध्यक्ष आप माजी सैनिक अशोक येडे,आप तालुकाध्यक्ष भिमराव कुटे सहभागी झाले. दरम्यान दिवसभर आंदोलन केले असले तरी. जिल्हाधिकारी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्यामुळे कुंपणच शेत खात आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे.जिल्हाधिकारी आता तरी भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं नैतिक बळ दाखवतील का? नेहमीसारखंच ते पुन्हा भ्रष्टाचारांना पाठबळ देतील का? गोरगरिबांना हक्काचं धान्य मिळणार का? यासारखे अनेक प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.