आपला जिल्हा

बोगस लोकांना जेलमध्ये घाला पण आम्हाला विमा कंपनी द्या ;शासनाकडे अॅड अजीत देशमुख यांनी केली मागणी

बीड  —  जिल्ह्यात भूमिहीन असलेल्या, सातबारा मध्ये खाडाखोड करून विमा भेटणाऱ्या आणि एक वेळेस नाही तर तब्बल २५ ते ५० वेळेला विमा भरणाऱ्याला वाटल्यास जेलमध्ये घाला. पण आमच्या शेतकऱ्यांना विमा कंपनी द्या. एका वर्षात दोनशे कोटींचा घोटाळा करणारे, त्यांची पाठराखण करणारे यांच्याशी सामान्य शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही. तात्काळ विमा कंपनी उपलब्ध करून द्या, अशी मागणी राज्याच्या मुख्य सचिवांना करण्यात आली आहे. यावेळीही निर्णय न झाल्यास पुढील पाऊल उचलले जाईल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी शासनाला दिला आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना विमा कंपनी दिलेली आहे. मात्र बीड जिल्हा यापासून वंचित राहिलेला आहे. याला मूठभर लोकांचे पाठबळ लबाड लोकांना मिळते, तेच लोक जबाबदार आहेत. एका एका वर्षात दोनशे कोटीची बोगसगिरी होत असेल तर विमा कंपनी ते सहन करू शकत नाही. मात्र आता सामान्य शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी पावसामुळे तर काही ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. हे नुकसान सर्वत्र झालेले आहे, असे नाही. मात्र भविष्यात निसर्ग धोका देऊ शकतो. त्यामुळे बीड जिल्ह्याला विमा कंपनी मिळणे आवश्यक आहे. भारतीय कृषी विमा कंपनीच्या मुंबई कार्यालयाची बीड जिल्ह्यासाठी नियुक्ती करावी. तेथील अधिकाऱ्यांनी आज पर्यंत लबाडांशी संगनमत केलेले आहे. त्यामुळे याच लोकांना बीडमध्ये पाठवावे, असे ही देशमुख यांनी म्हटले आहे.

जमीन नावावर नसताना विमा भरणे, सातबारा उताऱ्यात खाडाखोड करून क्षेत्र वाढवून विमा भरणे, आहे तेवढ्या क्षेत्राचा नाही तर त्या क्षेत्राचा दहा – वीस वेळा विमा भरणे, एकाच वेळेला अनेक बँकांमध्ये विमा हप्ता भरणे, अशा प्रकारचे कृत्य करणारे आम्ही उघडे केले होते. हे लोक करोडो रुपयांची बोगस विमा रक्कम परतही जाऊ द्यायला तयार नव्हते. हे लोक संगनमताने लूट करत होते. देश आपला आहे, हे ते विसरून गेले होते.

तेव्हापासून विमा कंपनी बीड मध्ये यायला घाबरत आहे. मात्र या लोकांच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडलेला नाही. हे लोक एक नवं जेल बांधून त्यात टाकले, तरचं खरा न्याय होईल. जिल्ह्यातील सामान्य शेतकरी यामुळे हतबल झालेला असताना शासनाने या मुद्यावर गांभीर्याने विचार करावा. बीड जिल्ह्याला विमा कंपनी तात्काळ द्यावी अन्यथा या मुद्द्यावर आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल, असे अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close