गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी

मुंबई — गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सुट्टी जाहीर केली आहे.मतदानासाठी नोकरदार वर्गाला भरपगारी रजा दिली जाणार आहे.
गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गुजरातमधल्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात सुट्टी जाहीर केली आहे. पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत गुजरात निवडणुकीसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला सार्वत्रिक सुटी जाहीर केलीय. विशेष म्हणजे मतदानासाठी नोकरदार वर्गाला भरपगारी रजा दिली जाणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी दिल्याचा राज्याच्या इतिहासातील हा पहिलाच निर्णय आहे. या निर्णयावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. हा निर्णय अनाकलनीय असल्याचं अजित पवार यांनी म्हटल आहे. आम्ही 15 वर्षात सत्तेत होतो पण आम्ही कधी अशी पगारी रजा दिली नाही, असा नवीन पायंडा पाडणं चुकीचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. निवडणुका दर पाच वर्षांनी येतात, पण याआधी महाराष्ट्रात असं कधी घडलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय नोकरी-व्यवसाया निमित्ताने गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रात राहतात. यापैकी अनेक नागरिकांची नावं गुजरातच्या मतदार यादीत आहेत, अशा नागरिकांना मतदान करता यावं यासाठी गुजरात विधानसभा मतदाना दिवशी सुट्टी देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेुसार राज्य सरकारने हा आदेश काढल्याचं म्हटलं जात आहे. हा आदेश मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही बजावण्यात आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. एकूण 182 जागांसाठी मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.