गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन जण भाजले

जालना –. घरातील गॅस सिलेंडर मधून अचानक गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात तीन जण गंभीर भाजल्या गेल्याची घटना जुना जालना परिसरातील सिद्धिविनायक नगर मध्ये शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30च्या सुमारास घडली.
ताराबाई केशव जाधव वय 65 वर यांच्या घरातील भाडेकरू मीना दिलीप घारे वय 38 वर्ष यांच्या घरातील गॅस सिलेंडरमधून अचानक गॅस गळती होऊन स्फोट झाला.
यावेळी उडालेल्या भडक्यात ताराबाई जाधव आणि मीना दिलीप घागरे घारे यांच्या साडीने अचानक पेट घेतल्याने त्या गंभीररित्या भाजल्या आहेत. तर शेजारच्या किराणा दुकानातील अनंता दत्ता मंडलिक (45) हे देखील गॅसच्या वाफेने भाजले आहेत.
घटनेची माहिती मिळताच जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि परिसर परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. ताराबाई जाधव आणि मीना घारे या 60 टक्के भाजल्या असून त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.मात्र आवश्यक त्या उपचारासाठी त्यांना नंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविले आहे.या स्फोटात भाजलेल्या अनंता मंडलिक यांच्यावर जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अचानक घडलेला सिलेंडरचा स्फोट व त्यानंतर महिलांचा आरडा ओरडा या मुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र परिसरातील काही नागरिकांनी वेळेचे भान राखत अग्निशमन दल, पोलिसांना पाचारण केल्यामुळे मोठी हानी टळली.