कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले; महावितरण विरोधात चक्काजाम

बीड — जिल्ह्य़ातील अतिवृष्टीत खरीपाची सोयाबीन,कापूस आदि पिके हातची गेल्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-याला ऐन ज्वारी,गहु,हरबरा रब्बी पिकांचा पेरा पुर्ण झाला असून पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असतानाच महावितरण कडुन थकीत विजबील वसुलीच्या नावाखाली कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे.
एक प्रकारे सुलतानी संकट महावितरणच्या मनमानी कारभारामुळे निर्माण झाले असून शेतक-यांना वेठीस धरण्याच्या महावितरणच्या धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१७ नोव्हेंबर गुरूवार रोजी लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतक-यांनी मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश बसस्थानक येथे “चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनात माजी. पं.स.सदस्य राजेभाऊ आप्पागिरे, माजी सरपंच कल्याणबापु वाणी,सरपंच कृष्णा पितळे , सरपंच आकाश शेळके, शेख युनुस च-हाटकर,पांडुरंग वाणी आंबेडकरवादी नेते रविंद्रजी निर्मळ, उपसरपंच शंकर वाणी,विक्की आप्पा वाणी ,अशोक वाणी आदि सहभागी होते निवेदन उपकार्यकारी अभियंता (ग्रामिण)महावितरण दिपक महाजन,सहाय्यक अभियंता विजय हलकुडे,आलोक देशपांडे,संकेत गेहलोत,सपोनि शेख मुस्तफा,सहाय्यक फौजदार निकाळजे,पो.हे. बामदळे,पोना. खांडेकर,डिडुळ,क्षीरसागर,शेलार,सय्यद,तांदळे आदिंना देण्यात आले.
शेतक-यांना अग्रीम,अतिवृष्टीत नुकसानीची मदत नाही मात्र विजबील वसुलीची घाई
पिकविमा,अग्रीम पिकविमा व अतिवृष्टीत नुकसान भरपाई आदि गोष्टी मिळण्यास विलंब होत असताना शेतक-यांप्रती संवेदनाशील होऊन मदत करण्याऐवजी महावितरण रझाकारी पद्धतीने शेतक-यांकडुन सक्तीची विजबिल वसुली करण्यासाठी कृषीपंपाचे वीज कनेक्शन कोणतीही पुर्व सुचना न देताच खंडीत करत असून त्यामुळे रब्बीची हातची पिके वाया जाण्याचा धोका असून याबद्दल शेतक-यांमध्ये तिव्र संतापाची भावना आहे.
सक्तीची विजबिल वसुली हक्काने करताय मात्र कर्तव्याची जाणीव ठेवा वेळेवर सुविधा पुरवा
महावितरण कडुन सक्तीची विजबिल वसुली करण्यात येत असतानाच विजबिल भरून सुद्धा सुविधा मिळत नाहीत सततचे भारनियमन,कमी दाबाने विजपुरवठा,नादुरूस्त ट्रान्सफाॅर्मर, त्याच्या दुरूस्तीसाठी शेतक-यांनीच वर्गणी गोळा करणे,ट्रान्सफाॅर्मरची अवस्था बकाल असुन उघड्यावर रोहीत्र,लोंबकळत असलेल्या जीर्ण तारा या सारख्या अनेक असुविधा असताना त्या पुरवण्याची जबाबदारी झटकून केवळ शेतक-यांनाच वेठीस धरण्याचे काम महावितरण कडुन करण्यात येत आहे.