ताज्या घडामोडी

आष्टी-नगर अतिरिक्त डेमु रेल्वेला मिळाली मुंबईला जाणाऱ्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांची फलश्रुती

आष्टी-पुणे डेमु रेल्वे सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबी तपासण्याचे ही रेल्वे राज्यमंत्र्यांचे आदेश

नगर — बीड जिल्ह्यातील प्रवाश्यांना आष्टीहुन मुंबईला जाता यावे याकरिता आष्टी-नगर डेमु रेल्वेला नगर येथून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेशी कनेक्टिव्हिटी देण्यात यावी या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला यश आले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आष्टीहुन येणाऱ्या अतिरिक्त डेमु रेल्वेला साईनगर शिर्डी एक्स्प्रेस या रेल्वेशी कनेक्टिव्हिटी देण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

नगर रेल्वे स्थानकावर नगर-आष्टी या अतिरिक्त रेल्वेसेवेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे , खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खा.प्रितमताई मुंडे बोलत होत्या. बीड जिल्ह्यातील प्रवाश्यांना रेल्वेने मुंबई, पुण्याला जाण्यासाठी नगरपर्यंत खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असे, आष्टी- नगर अतिरिक्त डेमु रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीने आता प्रवाश्यांची गैरसोय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आष्टीतून नगरपर्यंत धावणारी अतिरिक्त डेमु रेल्वे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेशी जोडली गेल्याने माझ्या मागणीला अंशतः यश आले असल्याचे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की ‘ लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प प्रगती पोर्टलवर घेतल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली. आज जरी रेल्वेचे स्वप्न आष्टीपर्यंत येऊन थांबले असले तरी राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे डिसेंबर 2023 पर्यंत हे स्वप्न बीड पर्यंत पूर्ण होणार आहे. नगर-बीड-परळी हा प्रकल्प ज्यादिवशी पूर्ण होऊन परळी ते मुंबई रेल्वे धावेल त्यादिवशी खऱ्या अर्थाने मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण होईल आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक वाटा निर्माण होतील असेही त्या यावेळी म्हणाल्या.

डेमु रेल्वे पुणेपर्यंत सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबी तपासा ; रावसाहेब दानवे

आष्टीहुन पुणे, मुंबईला जाण्याकरिता नगर रेल्वे स्थानकावरून डेमु रेल्वेला साईनगर-शिर्डी या रेल्वेची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. आष्टीहुन सुरू असलेल्या डेमु रेल्वेसेवेचा पुण्यापर्यंत विस्तार करण्यासाठी रेल्वे विभागाला तांत्रिक बाबी तपासण्याचे आदेश दिले आहेत, तसेच यासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे आणि खा.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्रालयात बैठक घेऊन ही मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.

अतिरिक्त डेमु रेल्वेचे वेळापत्रक

अतिरिक्त डेमु रेल्वे संध्याकाळी 03 वा.40 मिनिटांनी नगर रेल्वे स्थानकावरून आष्टीकडे प्रस्थान, संध्याकाळी 06 वा 30 मिनिटांना आष्टी येथे आगमन, संध्याकाळी 07 वाजता नगरकडे प्रस्थान व रात्री 09 वा 45 मिनिटांना नगर येथे आगमन, यामुळे आष्टीतून नगर येथे येणाऱ्या प्रवाश्यांशी सोय होणार असून डेमु रेल्वेला रेल्वे क्रमांक 11042 साईनगर शिर्डी ते मुंबई या रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button