ताज्या घडामोडी

अधिकारी गुत्तेदार भाऊ भाऊ; “महावितरण “सह कंत्राटी कामगार लुटून खाऊ

बीड — गुत्तेदार आणि वरिष्ठ अधिकारी महावितरण ला अक्षरशः लुटून खात असल्याचं पाहायला मिळत आहे.बोगस कामांसोबतच कंत्राटी कामगारांनाही लुटताना त्यांना वेठबिगार बनवलं आहे. कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या आलेल्या बोनसवर गुत्तेदाराने अक्षरशः डाका घातला आहे. एक महिना झाला तरी बोनस मिळाला नाही.बीडच्या अधीक्षक अभियंत्याचा वचक गुत्तेदारावर राहिला नाही. परिणामी महावितरणचा कारभार “निकम्मा” झाल्याचं पाहायला मिळू लागला आहे.

महावितरण मध्ये गुत्तेदारी पद्धत आली आणि या पद्धतीत गुत्तेदार व अधिकाऱ्यांचं चांगभलं झालं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस काम केली गेली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील टक्केवारीची भाषा बोलत या बोगस कामांना मूक संमती दिली. गुत्तेदार आणि अधिकारी भाऊ भाऊ दोघे मिळून महावितरण लुटून खाऊ अशीच स्थिती निर्माण झाली. एवढ्या वरच ही गोष्ट थांबली नाही तर गुत्तेदारामार्फत नियुक्त केलेले कंत्राटी कामगार देखील पिळवटून काढायला यांनी सुरुवात केली.महावितरण मध्ये काम करत असताना जीवावरचा खेळ कंत्राटी कामगारांनी करायचा आणि गुत्तेदाराने नुसताच मलिदा लाटायचा असा प्रकार सर्रास सुरू आहे. पूर्वीच्या जमीनदारांनी ,इंग्रजांनी वेठबिगार कामगारांची जसं शोषण करून स्वतःची तिजोरी भरली अगदी तीच स्थिती सध्या महावितरण मध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे. कंत्राटी कामगारांच शोषण होत असल्याचं दिसत असलं तरी रोजगार जाईल याची भीती असल्यामुळे कंत्राटी कामगार देखील आर्थिक शोषणा सोबतच मानसिक शोषणाला बळी पडत आहेत.गेल्या वर्षी 7 हजार 200 रुपये दिवाळीचं अनुदान कंत्राटी कामगारांच्या नावावर आलं.मात्र कंत्राटी कामगारांना फक्त 2500 रुपयाच्या नाममात्र रकमेवर गुत्तेदाराने बोळवलं. त्यावेळी “सह्याद्री माझा “ने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला मात्र जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी असलेले अधिक्षक अभियंता टक्केवारी मिळाल्यामुळे गप्प बसले त्यांनी कुठलीच गुत्तेदाराविरुद्ध कारवाई केली नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी टक्केवारी जास्त द्यावी लागली. परिणामी गुत्तेदाराच्या हातात जास्त रक्कम पडली नाही. त्यामुळे यावेळी मात्र बोनसच्या सर्वच रकमेवर डाका घालण्याचं काम गुत्तेदाराने केलं. दिवाळी संपून एक महिन्याचा कालावधी होत आला तरी अजूनही एक रुपया देखील कंत्राटी कामगारांच्या खात्यावर जमा झाला नाही. आता याविरुद्ध देखील आम्ही आवाज उठवला असला तरी यात कर्मचाऱ्यांचा फायदा कितपत होईल हे सांगणं अवघड आहे मात्र वरिष्ठ अधिकारी पांघरून घालण्यासाठी टक्केवारी वाढवतील पुन्हा हे प्रकरण बासणात गुंडाळल्या जाईल. अधिकारी गुत्तेदार दोघांच्या दिलजमाइत मात्र कंत्राटी कामगार पिळवटून निघेल यात शंका नसल्याच बोललं जाऊ लागला आहे. अधीक्षक अभियंत्याच्या “निकम्या” कारभारा सोबतच गुत्तेदाराच्या मनमानीला लगाम घालण्याचे काम करतांना मुख्य अभियंत्याचे हात “लटपटू” नयेत. महावितरण चा कारभार “सुंदर” व्हावा कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button