ताज्या घडामोडी

नगर परिषदेच्या आडून सत्ताधाऱ्यांची गेवराईत हिटलरशाही – विजयसिंह पंडित

झोपेत असताना व्यापाऱ्यांच्या दुकानांवर फिरला बुलडोजर

गेवराई — न्यायालयाची अंतरीम स्थगिती असतानाही केवळ सत्ताधाऱ्यांनी किराया न देणाऱ्या दुकानांवर बुलडोजर फिरविण्याचे पाप केले आहे. नगर परिषदेच्या आडून सत्ताधाऱ्यांनी गेवराईत हिटलरशाही सुरु केली असून साखर झोपेत असलेल्या दुकानांवर सत्तेचा गैरवापर करून बुलडोजर फिरविल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे. रात्री उशिरा नगर परिषदेने गेवराई शहरातील अतिक्रमण धारकाविरुध्द केलेल्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निषेध केला आहे.

गेवराई नगर परिषदेने शास्त्री चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यानच्या ३३ दुकानदारांविरुध्द काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईचा निषेध गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले की, न्यायालयाची अंतरीम स्थगिती असताना अतिक्रमण काढण्याची कारवाई कशी होते ? जिल्हा परिषद शाळा, कन्या शाळा, कोल्हेर रोड, जुने बसस्टँड परिसर आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतच्या अतिक्रमण धारकांना संरक्षण देणाऱ्यांनी केवळ त्यांना दरमहा किराया देत नाहीत म्हणून या हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब व्यापाऱ्यांच्या विरुध्द कारवाई केली आहे. मा.उच्च न्यायालयाने वेळोवेळी गेवराई शहरातील अनेक अतिक्रमणे काढण्याचे आदेश पारीत केलेले असतानाही वर्षानुवर्षे हीच नगर परिषद या बाबत कारवाई का करत नाही ? केवळ स्वतःच्या शॉपिंग सेंटरमधील व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ व्हावी म्हणून तर ही कारवाई झाली नाही ना ? असा सवालही विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केला आहे.

शास्त्री चौकात बांधलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स सुध्दा अतिक्रमणात असतानाही ते पाडण्याचे धाडस नगर परिषद दाखवणार नाही मात्र गोरगरीबांच्या हातावर पोट असलेल्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण पाडण्यात पुढाकार घेणाऱ्या नगर परिषदेचा कर्ता करविता पडद्या आडून दडपशाही करत असल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे. अनेक वर्षे हे व्यापारी नगर परिषदेचे भुईभाडे भरत होते, नगर परिषदेच्या ऐवजी स्वतःला किराया दिला नाही म्हणून या व्यापाऱ्यांच्या विरुध्द रोष असल्यामुळेच ही कारवाई झाल्याचे व्यापाऱ्यांनी भेटून सांगितल्याचेही विजयसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले. एकंदरीतच सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढल्यामुळे ही हिटलरशाही सुरु असून लवकरच गेवराईतील नागरीक निवडणुकीत हा सत्तेचा माज उतरवतील असा इशारा त्यांनी शेवटी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, नगरसेवक राधेशाम येवले, दादा घोडके, बंडू मोटे, शाम रुकर, नवीद मशायक, गुफरान इनामदार, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा, दत्ता दाभाडे, गोरख शिंदे, सरवर पठाण, अक्षय पवार, अमित वैद्य, जालिंदर पिसाळ, शांतीलाल पिसाळ, किशोर कांडेकर, शेख रहीम, संदिप मडके, शेख आलीम, खालेद कुरेशी, रविंद्र दाभाडे, राहुल मोटे, सय्यद अल्ताफ, वसीम फारुखी, सुभाष गुंजाळ, कडुदास कांबळे, सय्यद नजीब, आवेज शरीफ, धम्मपाल भोले, रजनी सुतार आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button