कृषी व व्यापार

आसमानी संकटानंतर शिंदेंचं सुलतानी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर ऊठलं!शेतीचा वीज पुरवठा खंडित करत सूटल

बीड — आसमानी संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसल्यानंतर दमडीची ही मदत न करणाऱ्या शिंदे सरकारने आता शेतकऱ्यांचा शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचं काम सुरू करत शेतकरी चांगलाच कोंडीत पकडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचं दिलेलं आश्वासन हवेत विरल्याचं पाहायला मिळत आहे.

तीन-चार महिन्यापूर्वी राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टीने शेतकरी पार कोलमडून गेला असला तरी कवडीची ही मदत दिली नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडू दिलं नाही. उभपिक शेतात साचलेल्या पाण्यात सडून गेलं. मात्र बीड जिल्ह्याला आतापर्यंत कुठलीच मदत सरकारने केली नाही. घोषणेच्या आश्वासनाचा गाजर देखील इथल्या शेतकऱ्यांना दाखवलं नाही.मदत मिळेल की नाही याचा भरवसा नाही. विमा कंपनीने देखील हात आखडता घेत काही महसूल मंडळाला अग्रीम दिला.बाकीच्या मंडळांना नुसता चुनाच लावला. या सर्व संकटात बीडच्या लोकप्रतिनिधींनी देखील नुसती बघायची भूमिका घेतली. एकही लाल रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवू शकला नाही. आमदारापासून खासदारापर्यंत प्रत्येकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचं नाटक केलं. मगरीचे अश्रू ढाळले. याचा शेतकऱ्यांना फायदा काही झालाच नाही.या आस्मानी सुलतानी संकटात देखील शेतकऱ्यांनी उसनवारी करून सावकाराचे उंबरठे झिजवून तन माजलेली शेती नीट केली.चाड्यावर मूठ धरत कशीबशी पेरणीस सुरुवात केली. अनेकांनी आसमानी सुलतानी संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य न दाखवता जीवन यात्रा संपवली. दररोज माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे रकाने भरू लागले आहेत. शेतकऱ्यावर कोसळलेले हे संकट कमी होते की काय म्हणून शिंदे सरकारनं नवसंकट शेतकऱ्यांपुढे उभं केलं आहे. राजकीय पक्षांना खिंडीत गाठता गाठता शेतकऱ्यांना देखील खिंडीत गाठला आहे. शेतकऱ्यांच्या शेताला होणारा वीज पुरवठा खंडित केला जाऊ लागला आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी आता कुठला सावकार गाठून त्याच्याकडून पैसे घ्यायचे व विज बिल भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीत नदी नाल्याला पाणी आहे पण वीज नाही तर शेती पिकणार कशी? शेत पिकली नाही तर शेतकरी जगणार कसा? मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचं आश्वासन दिलं. पण थोड्याच दिवसात ते हवेत विरल्याचं पाहायला मिळू लागलं. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी सरकार व वरपू लागल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागला आहे. शिंदे सरकारला शेतकरी आता पुरता संपवायचा आहे की काय? बीड जिल्ह्याचा सरकारला मसन वाटा करायचा आहे काय?असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जाऊ लागला आहे. शेतीचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे शिंदे फडणवीस सरकार विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यात संतापाची भावना निर्माण होऊ लागली. सरकारला थोडी जरी दया माया असेल तर किमान पीक हातात येईपर्यंत तरी शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button