बीड: जालन्याच्या व्यापाऱ्यास साडेचार लाखाला लुटले

बीड — जालना येथील व्यापारी किराणा दुकानाच्या मालाच्या खरेदीसाठी आलेला असतांना जालना रोडवर दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. चोरट्याने लंपास केलेल्या पिशवीत साडेचार लाख रुपये असल्याचं व्यापाऱ्यांने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
जालन्याच्या राजटाकळी येथील विठ्ठल नानासाहेब आर्दड वय 67 वर्ष यांचे जालना जिल्ह्यात दोन किराणा दुकान आहेत. ते किराणा दुकानातील माल खरेदीसाठी महिन्यातून दोनदा बीडला येत असतात. मंगळवारी देखील ते खरेदीसाठी दुपारी बीडला आले होते. जालना रोड परिसरात आल्यानंतर त्यांचे वाहन खराब झाल्यामुळे शहरातील साई पॅलेस परिसरातील एका गॅरेजवर ते थांबले होते. खराब झालेले गाडीचे पार्ट आणण्यासाठी ते रस्त्याने जात असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी विठ्ठल आर्दड यांच्या हातातील कापडी पिशवी हिसका देऊन लंपास केली.. या पिशवीत आर्दड यांनी खरेदीसाठी आणलेले साडे चार लाख रुपये होते. आर्दड यांच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.