स्थानिक गून्हे शाखेच्या कारवाईत तीन लाखांची बनावट दारु जप्त

बीड — बनावट दारूचा धंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने सध्या जोरात सुरू आहे. या धंद्याला स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद देखील मिळत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिदोड शिवारात कारवाई करत तीन लाख रुपयाची बनावट दारू हस्तगत केली आहे.
दारूबंदी विभाग सध्या झोपेचं सोंग घेत असून दारूचा गोरखधंदा राजरोस सुरू आहे. पर राज्यातील बंदी असलेली दारू मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात विक्री होत आहे सोबतच बनावट दारूचा धंदा देखील सुरू असून लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिदोड शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सोनाजी अशोक जाधव वय 28 रा.गांधीनगर, बीड हा बनावट दारु तयार करुन विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या ठिकाणी छापा मारला.या छाप्यात बनावट दारु तयार करण्याचे साहित्य, दारु असा 2 लाख 94 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी सोनाजी जाधव याच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 341/2022 कलम 328 भादंविसह कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे सुधारीत 2018 चे कलम 12, 13, 65(अ),(ब),(क), (ड), (ई), (फ), 80 व 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पोह.मनोज वाघ, रामदास तांदळे, पोना.विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, नारायण कोरडे चालक अशोक कदम यांनी केली.