सकारात्मक: मुस्तफांची योजना भारी; दारू मिळतेय प्रत्येक धाब्यावरी

बीड — राज्याच्या अर्थचक्राला गती मिळावी यासाठी नेकनूरचे सहा. पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी अफलातून कल्पनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण योजनेमुळे गाव खेड्यातल्या प्रत्येक धाबा,हॉटेलवर प्रत्येक ब्रँडची दारू लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सहज उपलब्ध होऊ लागली आहे. धाब्यांची संख्या देखील त्यामुळे वाढली आहे.परिणामी घाटमाथ्यावर बेरोजगार तरुणांना रोजगार तर मिळू लागला आहेच शिवाय राज्याच्या अर्थकारणाला चालना देखील मिळू लागली आहे.
कायदा हा जनकल्याणासाठी वापरावा लागतो ही बाब लक्षात घेऊन नेकनूरच्या ठाणे प्रमुखांची वाटचाल सुरू आहे.घाट माथ्यावर रोजगाराची कुठलीच संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी नवीन कल्पना अमलात आणण्यास सुरुवात केली. प्रत्येक धाब्यावर दारू विक्रीस मोकळीक दिल्यामुळे अनेकांना रोजगाराचं साधन अगदी सहज उपलब्ध झालं.यातून धाब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली.बनावट दारू बरोबरच देशी-विदेशी ब्रँड अगदी सहज आबाल वृद्धांना देखील उपलब्ध होऊ लागली. हातभट्टी सारखे व्यवसाय नावारूपाला येऊ लागले. विशेष म्हणजे आता दारू विक्रीसाठी परवानगी घ्यायची म्हटलं तर कागदपत्रांची झंझट राहिली नाही. सरकारी कार्यालयाचे उंबरठे शिजवण्याची देखील गरज राहिली नाही.नवी तरुणाई एक तर या रोजगारात उतरू लागली नाहीतर किमान दिवसभर झिंगत राहून स्वर्ग सुखाचा आनंद घेऊ लागली. यातून एखादा वाद दुर्दैवाने उद्भवलाच तर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर वाद विवादात अडकलेली दोन्हीकडची मंडळी आर्थिक दृष्ट्या पिळवटून काढली जात असल्यामुळे पुन्हा ठाण्याकडे जाण्याची हौस त्यांना येतच नाही.त्यामुळे शांततेसाठी कायद्याच्या बडग्याचा वापर करण्याची गरज भासत नाही. यातून ठाण्यात वापरण्यात येणारी स्टेशनरीची देखील बचत होते.परतीच्या पावसाने शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत सापडला आहे. अशावेळी टोकाचं पाऊल उचलण्यापासून या मद्य क्रांतीमुळे परावृत्त करण्यात एक प्रकारे मदत होऊ लागली आहे. मद्य क्रांतीमुळे धाब्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे ग्रामीण भागाच अर्थचक्र तर गतिमान झालंच आहे मात्र राज्याच्या तिजोरीत देखील भर पडू लागली आहे.अशी अचाट कल्पनाशक्ती असलेल्या अधिकाऱ्यामुळे बालाघाटावर मद्य चळवळीची नवी पहाट निर्माण झाली असून सर्वांचचं भवितव्य उज्वल बनू लागल्याच चित्र सध्या पहायला मिळू आहे.