आता मराठीतून मिळणार वैद्यकीय शिक्षण — वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

मुंबई — महाराष्ट्रात आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
एमबीबीएससह (MBBS) आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल. अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर करावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याता आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असंही महाजन म्हणाले आहेत.केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यांमध्ये त्या त्या भाषेतून तेथील शिक्षण देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला असल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.