अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यात “तुम्ही दारू पिता का?”असा सत्तारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न केला

बीड — वादाच्या भोवऱ्यात नेहमीच राहत असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहेत. बीड दौऱ्यात असताना त्यांनी चक्क जिल्हाधिकार्यांनाच दारू पिता का? असा प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये संताप व्यक्त केला जात आहे तर राजकीय वातावरण देखील तापले आहे.
. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान केले यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली मात्र राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं सांगत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाद निर्माण केला. त्यातच आता अब्दुल सत्तार बीडच्या दौऱ्यावर अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले असताना जिल्हाधिकाऱ्यांसोबत गप्पा मारत चहा पिताना त्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच आपण दारू पिता का? असा प्रश्न विचारला. शेतकरी देशधडीला लागलेला असताना कृषिमंत्री दारूच्या गप्पा मारत आहेत यावरून शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. यावरून आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत.“महाराष्ट्राचे कृषीमंत्री बीड जिल्ह्यात पिकांचं नुकसान पाहण्यासाठी गेले होते की, जिल्हाधिकाऱ्यांना ‘दारू पिता का?’ विचारण्यासाठी. सैराट झाल्यासारखे महाराष्ट्राची सत्ता उलथापालथ करुन, सरकार स्थापन केलं. सरकारी अधिकाऱ्यांशी दारूच्या गप्पा मारता. त्यामुळे या सैराटच्या नादात मिंधे गट नसून, हा झिंगे गट झाला आहे,” अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?,’ असा प्रश्न उपस्थित करत कविता ट्विट केली आहे. “गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो, हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो,” असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.