महाराष्ट्र

माऊली, तुकोबारायांच्या पादुका एसटीने पंढरीला जाणार

मुंबईराज्यात वाढत्या कोरोना संकटाला पाहता यावर्षीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जणांना बसण्याची परवानगी आहे. तसेच फिजिकल डिस्टसिंग काटेकोरपणे पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने ३० जून दशमीला मार्गस्थ होणार आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी साध्या पद्धतीने होत आहे. अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत १२ आणि १३ जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मात्र, दोन्ही संतांच्या पादुका या पंढरपूरकडे एसटी बस की हेलिकॉप्टर मधून जाणार याबाबत निर्णय होत नव्हता. आता अखेर प्रशासनाने एसटी बसने पादुका नेण्याची परवानगी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातून संतांच्या पादुकांना अटी आणि कार्यपद्धती अवलंबून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी तर संत तुकाराम महाराज संस्थान, देहु तसेच संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि चांगावटेश्वर देवस्थान, सासवड यांना पंढरपूर येथे पादुका घेऊन जाण्यास परवानगी मिळालेली आहे.

बसमध्ये २० व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली असून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना परवानगी नाही. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तींची कोविड टेस्ट करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याबाबतही विभागीय आयुक्तांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. संतांच्या पादुका असलेले वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close