आयुक्त तुकाराम मुंढे दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकणार;आरोग्य विभागाची झाडाझडती घेणार

बीड — कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी असलेले आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी व बुधवारी बीड जिल्हा दौऱ्यावर येऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार असल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.
आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार घेताच तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी हजर राहण्याच्या सूचना दिल्या.सोबतच राज्यभरात रात्रीच्या वेळी अचानक तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. अधिकाऱ्यांची ऑनलाइन आढावा बैठक घेऊन त्यांनी रुग्णसेवा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाळवंडी व च-हाटा येथील आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या होत्या त्यावेळी डॉक्टरांची गैरहजरी दिसून आली होती. बीड जिल्ह्यात 25 व 26 ऑक्टोबरला दौऱ्यावर येणारे आयुक्त तुकाराम मुंढे हे आरोग्य केंद्रांना भेटी देण्यासोबतच सर्व आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या झोपा उडाल्या असून धावा धाव सुरू झाली आहे.आयुक्त मुंढेनी आढावा घेताना कुचराई आढळली तर आपली काही खैर नाही या विचाराने खराब काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.