शिंदे सरकारची शेतकऱ्यावर छत्र छाया;”कोरडी माया अन् उपाशी बस ग बया”

बीड — परतीच्या पावसाने शेतकरी उध्वस्त केला असला तरी दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकारकडून कुठलीच मदतीची ठोस घोषणा अद्याप झाली नाही. ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पन्नास हजार रुपये एकरी अनुदान द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.असंअसलं तरी पंचनाम्याचा फार्स केला जात आहे.सध्या रोजच पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली असली तरी सरकारही शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं पाहायला मिळू लागला आहे. सरकार फक्त धीर धरा म्हणतयं “कोरडी माया अन् उपाशी बस ग बया” या म्हणीचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे
उभ्या पिकाची नासाडी झाली असताना शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घासाची डोळ्यासमोर माती झाली. जोरदार पावसाने बळीराजाच्या अश्रू ने देखील आता साथ सोडली आहे. बीड जिल्हा तर “एकनाथा”च्या राज्यात अनाथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भर दिवाळीत देखील अतिवृष्टी होऊ लागल्यामुळे शेतात गुडघाभर पाणी तर नदी नाल्या दुथडी भरून वाहू लागले आहे. या मध्ये शेतकऱ्यांच पिक उभ्या उभ्याच शेतात सडून गेल आहे. गुरुवारी मध्यरात्री बहुतांश जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. अंबाजोगाई परळी बीड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. हीच परिस्थिती चौसाळा मांजरसुंबा भागात देखील पाहायला मिळाली. तब्बल दोन तास झालेल्या पावसाने उभ्या सोयाबीन पिकाच्या शेंगा झडून एखादी शेंग राहिलीच तर ती आतून सडून गेली. या पावसात शेतकऱ्यांचं पुरतं दिवाळं निघालं असं असलं तरी कृषिमंत्री अब्दुल सत्तार ओला दुष्काळ जाहीर करण्या इतकं नुकसान झालंच नाही ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही असं सांगून आपले हात झटकले. शिंदे सरकारने आतापर्यंत कुठलीच ठोस मदतीची घोषणा केली नाही. बीडचा शेतकरी सध्या आसमानी संकटासोबतच सुलतानी संकटाने देखील पुरता कोलमडून गेल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षभर जगायचं कसं इथं पोटाची खळगी भरायची मारामार तिथं दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारातून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ लागली आहे त्यातूनच आत्महत्यांचा आकडा वाढला आहे. पंचनामे होणार कधी मदत मिळणार कधी सर्वात जास्त पिक विमा भरणारा जिल्हा म्हणून गौरविले गेलेला बीड जिल्हा पिक विम्याच्या 25% आग्रीम विम्यापासून अजूनही वंचित आहे. विमा कंपनी जबाबदारी झटकण्याची पळवाट शोधत आहे. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या हाल अपेष्ठाकडे अजून पाहिला तयार नाही. धीर सोडू नका सरकार पाठीशी आहे असं म्हणून कोरडी माया दाखवत आहे. “कोरडी माया अन् उपाशी बस गं बया “या म्हणीची प्रचिती येऊ लागली आहे.