उद्यापासून मान्सून परतणार, आजचा दिवस काही भागात पाऊस

पुणे — परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं असून खरीप पिक हातची गेली आहेत.मात्र थोडा दिलासा देणारी बातमी आली असून मान्सून अखेर गुरुवारी संपूर्ण राज्यातून परतणार असल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे.
देशासह राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. मात्र आता हा पाऊस गुरुवारी महाराष्ट्रातून परतीचा प्रवास करणार आहे.त्यामुळे राज्यातील पाऊस 20 ऑक्टोबरपासून पूर्णपणे कमी होणार आहे, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालसह महाराष्ट्रातून आगामी 48 तासांत म्हणजेच 20 ऑक्टोबरला गुरुवारी राज्यातील पाऊस पूर्णपणे कमी होणार आहे. अरबी समुद्राच्या मध्य भागापासून महाराष्ट्रापर्यंत चक्रीय स्थिती, तसेच वायव्य अरबी समुद्र ते केरळ आणि पुढे महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या दोन स्थितीमुळे राज्याकडे बाष्प आणि वारे वाहत आहेत. त्यामुळेच पावसाने धुमाकूळ घातला आहे.
चक्रीवादळाचे संकेत मात्र राज्यावर परिणाम नाही
बंगालच्या उपसागरातील उत्तर अंदमानात 20 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन 22 ऑक्टोबर रोजी त्याचे रूपांतर
अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे 26 व 27 ऑक्टोबरदरम्यान त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा परिणाम राज्यावर होण्याची शक्यता नाही, अशी माहिती सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान 19 ऑक्टोबर रोजी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, लातूर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.