महाराष्ट्र

कोंब : शिंदेंच्या राजकीय महत्त्वकांक्षेचे; शेतकऱ्यांच्या बरबादीचे!

कोंबऽऽऽ! कधी कुठे कसा कशाला फुटला हे कालपरत्वे त्याचं महत्त्व ठरतं. कधी तो सृजनतेकडे घेऊन जातो तर कधी बरबादीकडे कधी तो अल्हाददायक असतो तर कधी दुःखदही असतो. हे परिस्थितीनुरूप ठरतं. सद्यस्थितीत देखील याच स्थितीतून महाराष्ट्रातील जनता जात आहे.एकीकडे राजकीय महत्त्वकांक्षेला कोंब फुटले आहेत त्यातून आपल्या चार दोन पिढ्याच्या भवितव्याचं स्वप्न राजकारणी मंडळी पाहत आहे तर दुसरीकडे उभ्या सोयाबीन कापूस पिकाला काढणी आधीच कोंब फुटल्यामुळे शेतकऱ्यांना बरबादीकडे घेऊन जात आहेत. त्यांच्या पिढीचं भवितव्य अंधाराकडे असल्याचे चित्र सध्या दिसू लागला आहे. राजकीय स्थित्यंतर झाली यातून आरोप प्रत्यारोप झाले विश्वास ‘पानिपत’ मध्येच गेला हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.या सर्व प्रक्रियेतून अनेकांच्या महत्त्वकांक्षेला कोंब फुटले, यातूनच स्वतःच्या भवितव्या शिवाय दुसऱ्याचा विचार करण्याची भावना संपल्यात जमा झाली.जनता वाऱ्यावर सुटल्याचं दिसू लागलं. एकमेका विरोधात डावपेच आखण्यात सारीपाटाच्या खेळात चितपट करण्यात राजकीय मंडळी व्यस्त झाली. ज्यांच्या जीवावर आपलं राजकीय अस्तित्व अवलंबून आहे त्या जनतेचा सोयीस्कर विसर त्यांना पडू लागला. आम्ही जे काही करतो आहे ते सर्व जनहितासाठी आहे. हे सांगत आपलंच घोडं दामटण्याचा त्यांचा अजूनही प्रयत्न आहे.सुरुवातीला या राजकीय घडामोडीकडे जनतेने विनोदाने पाहिले सर्व घटना घडामोडींची चवीने पारावर चर्चा केली गेली.पण नेमकं याच वेळी निसर्गाने अवकृपा केली. अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांनी उराशी बाळगलेलं भवितव्याच स्वप्न पाण्यात बुडू लागलं. काढणीला आलेलं सोयाबीन गुडघाभर पाण्यातून काढायचं कसं हा प्रश्न भेडसावू लागला पावसाने रोजच पाठशिवणीचा खेळ सुरू केला. तीच परिस्थिती कापसाची देखील झाली. कापसाला यावेळी तरी चांगला दर मिळेल सुखाचे दोन घास कुटुंबाला मिळतील एवढीच छोटीशी आशा ती देखील अतिवृष्टीने मावळून गेली. कापसाच्या देखील वाती झाल्या. एरवी काळ्या आईची ओटी (पेरणी केल्यानंतर) भरल्यानंतर जमिनीतून जसा कोंब बाहेर येतो तसतसं शेतकऱ्याच्या स्वप्नांना देखील पालवी फुटते नवीन सृजनाची ती सुरुवात असते.पण हेच कोंब आता उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला फुटू लागले आहेत. यात शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती होत असल्यान “दे माय धरणी ठाय “अशी अवस्था सध्या झाली आहे. यातून शेतकऱ्यांच्या मनात निराशेची भावना जोर धरू लागली आहे. पावसाने जोर धरला की शेतकऱ्यांच्या मनात भवितव्याच्या विचाराचं काहूर माजू लागला आहे. यातच राजकीय बुद्धिबळाच्या खेळात शेतकऱ्यांच्या ‘दीन’अवस्थेकडे पाहायला कुणाला वेळ राहिला नाही. आसमानी संकटांसोबतच सुलतानी संकटाला तो सामोरा जाऊ लागला.विनोदाने राजकीय घडामोडीची चर्चा करणारा शेतकरी आता स्वतःच्या नशिबासोबतच राजकारण्यांना देखील शिव्यांची लाखोळी वाहू लागला. बीडच्या शेतकऱ्यांची परिस्थिती तर अतिशय वाईट झाली आहे.सरकारकडून कुठलीच ठोस मदत मिळाली नाही आश्वासन सुद्धा पदरात पडली नाही. पावसाने उघडीप दिली तरी कोंब फुटलेलं सोयाबीनची काढणी करून करायचं काय इथं चांगल्या सोयाबीनला केंद्र सरकारच्या धोरणामुळे भाव राहिला नाही. तिथं काळ्या पडलेल्या कुजलेल्या सोयाबीनला भाव कसा मिळणार? पिकाची काढणी करण्यासाठी लागणारा खर्च देखील यातून निघणार नाही. शेतामध्ये पावसामुळे माजलेलं तण काढायचं कसं रब्बीची पेरणी करायची कशी? ती करताच आली नाही, पुन्हा बियाणं पेरण्याची आर्थिक क्षमताच राहिली नाही तर पुढे जगायचं कसं यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राजकारण्यांची दिवाळी गोड होईल पण शेतकऱ्यांची दिवाळी मात्र कडू झाली आहे. दिवाळीच्या काळात शिमगा करण्याची वेळ आली आहे. यातच भरीस भर म्हणून पंतप्रधानांनी मास्टर स्ट्रोक लागावत शेतकऱ्यांना कमी दरात मिळणार राशनचं धान्य देखील बंद केलं.यातून ऊस तोड कामगारासाठी प्रसिद्ध असलेलं बीड भूकबळीच केंद्र बनू नये अशी भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

सध्याची जागतिक परिस्थिती पाहता जागतिक भूक निर्देशांकात भारताची क्रमवारी आणखीनच खराब झाली आहे. या पूर्वीचा अहवाल पाहता नव्या अहवालात भारताची 6 स्थानांनी घसरण झालीय. ताज्या क्रमवारीनुसार, भारत 121 देशांमध्ये 107 व्या क्रमांकावर आहे. या पूर्वी 116 देशांच्या क्रमवारीत भारत 101 व्या क्रमांकावर होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या क्रमवारीत भारताच्या शेजारी असणारे पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ हे देश भारताशी तुलना केल्यास चांगल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत. दक्षिण आशियातील देशांमध्ये अफगाणिस्ताननंतर भारताची स्थिती सर्वांत वाईट आहे. देशाच्या भूक निर्देशांकाचा विचार केला तर बीड जिल्हा नावा रूपाला आणण्याचा विचार तर राज्य सरकारकडून केला गेला नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.राज्य सरकारनेही बीड जिल्ह्याला मदत करताना हात आखडता घेतला. नव्या सरकारला बीडच्या जनतेचं सोयर सुतक नाही. राजकारणातून एखादा जिल्हा सुटला तर फारसा फरक त्यांना पडणार नाही पण या सर्व परिस्थितीतून जिल्ह्याचा मसणवाटा व्हायला वेळ लागणार नाही. गेल्या दोन-तीन दिवसात आत्महत्यांचा सत्र वाढलं हे येणाऱ्या काळातील थरकाप उडवणाऱ्या घटनांच ट्रेलर आहे. या सर्व घटनांमध्ये शेतकऱ्यांचा दोष काय आहे हे पडताळण्याची वेळ आली आहे. जसं वाळवंटात देखील एखादं बियाणं रुजत त्याला कोंब फुटतात त्याचं झाड बनत तसंच शेतकऱ्यांना देखील आता राजकीय अनास्थेच्या
वाळवंटात आशेच बियाणं रुजवून नव्या क्रांतीचे कोंब कसे फुटतील यासाठी संघटित प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button