निसर्गानेही गद्दारी केली; मायबाप सरकार खोके,बोके एकदम ओके च्या राजकारणातून आता तरी बाहेर पडा बीडच्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या!

बीड — जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असली तरी बहुतांश भागात दररोज पडत असलेल्या पावसाने उभ्या सोयाबीन पिकाला कोंबं फूटू लागली आहेत.शेंगातील दाने काळे पडले असून डोळ्यादेखत आलेलं पीक पुन्हा मातीत गेल आहे.निसर्गाने शेतकऱ्यांशी गद्दारी केली तशीच व्यवस्थेनेही केली.शेतकरी पूर्ण कोलमडून गेला आहे परिणामी मृत्यूला तो कवटाळत आहे. काल केज मध्ये तर आज आष्टी मध्ये शेतकऱ्यांने आपली जीवन यात्रा संपवली.एका नाथाच्या राज्यात बीडचा शेतकरी मात्र अनाथ असल्याचं पाहायला मिळू लागला आहे. मायबाप सरकारने आता तरी खोके बोके ओके च्या राजकारणातून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या मदतीला धावावे अशी मागणी होऊ लागली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वरूण राजाने शेतकऱ्यावर आपली वक्रदृष्टी फिरवली आहे. त्यामुळे अतिवृष्टी व रोज होणारा पाऊस यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचलं आहे. हाता तोंडाशी आलेला सोयाबीन पिकाचा घास शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची अपेक्षा फोल ठरू लागली आहे. उभ्या सोयाबीन पिकाला कोंब फूटू लागले आहेत. शेंगातील सोयाबीनचा दाणा काळा पडला आहे. उभ्या असलेलं पीकाच्या शेंगा कुजून खाली पडू लागल्या आहेत. ज्यांनी काढणी केली आहे त्यांचे सोयाबीनचे ढिगारे भिजून त्याचंही शेण झाला आहे.
उद्या या पिकाची काढणी केली तरी काळ्या पडलेल्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीनला बाजार भाव कसा मिळणार? मोदी सरकारच्या धोरणामुळे चांगल्या सोयाबीनला भाव नाही तिथं सडलेल्या सोयाबीनला कोण विचारणार? तीच परिस्थिती कापसाची देखील झाली आहे.
फुटलेला कापूस देखील वाफू लागला आहे. कापसाच्या वाती झाले आहेत. तीच परिस्थिती तुरीची देखील आहे. पाण्यामुळे तुरीचा खराटा झाला आहे. उभ पीक जळू लागला आहे.
बीडच्या शेतकऱ्यांना तर रडायला जागा पुरत नसल्याचं दिसू लागला आहे. पीक पेरणीच्या वेळी गोगलगायीनी शेकडो एकर उभ्या पिकाचा फडशा पाडला. त्यामुळे दुबार तिबार पेरणी करावी लागली. कसं बस पिक शेतात बरं दिसू लागलं तर पावसाने एक महिन्याचा खंड दिला. माळराना वरची पिक अक्षरशः करपली तर चांगल्या जमिनीतील पीक तग धरून राहिली पण शेंगाच प्रमाण नगण्य राहिलं. त्यानंतर जिल्ह्यात अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली जमिनी खरवडून गेल्या पिकं वाहून गेली.पण 50 खोके एकदम ओके च्या खेळात अडकलेल्या सरकारला शेतकऱ्यांची कैफियत पाहायला वेळ मिळालाच नाही. विमा कंपनीने आग्रीम देण्यास नकार दिला. अनुदान स्वरूपात शासनाने कुठलीच मदत शेतकऱ्यांना दिली नाही. पिक कसाबसं हाती येईल किमान पेरणीचा खर्च निघेल व रब्बीच्या पिकावर तरी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवता येईल अशी आस शेतकऱ्यांनी बाळगली होती पण पुन्हा शासनासोबतच पावसाने देखील शेतकऱ्यांशी गद्दारी केली.या गद्दारीने मात्र शेतकरी पूर्ण कोलमडून गेला. हातचं पीक शेतातच उभ्या उभ्या सडलं! उद्या जमीन नीट करायची कशी? त्यात पेरणी करायची कशाच्या जीवावर?
कुटुंब जगवायचं कसं? बँकांनी पीक कर्ज दिलं नाही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतलं ते आता फेडायच कस? लेकी बाळीच लग्न करायचं कसं? यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे राक्षसासारख्या उभ्या ठाकल्या आहेत.अतिशय दारुण परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे.यातच आता निराशेच्या गर्तेत सापडलेला शेतकरी मृत्यूला कवटाळू लागला आहे. केज तालुक्यातील राजेगाव येथील संतोष दौंड या चाळीस वर्षे शेतकऱ्यांनी पीक हातचं गेलं पदरात असलेल्या तीन मुलींची लग्न कसं करायचं सोसायटीचा कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. तर आष्टी तालुक्यातील पांढरीच्या 55 वर्षीय शेतकऱ्याने रविवारी शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्याला एक मुलगा चार मुली आहेत त्यांचं पुढे कसं होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.आधीच शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. ती आणखी संख्या आणखी वाढते की काय अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.आता तरी मायबाप सरकारने बीडच्या शेतकऱ्यांची कैफियत ऐकावी खोके, बोके एकदम ओके च्या राजकारणातून बाहेर पडून शेतकऱ्यांना सढळ हाताने अनुदान स्वरूपात मदत करावी विमा कंपनीला विमा देण्यास भाग पाडावे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.