महाराष्ट्र

चीनविरोधात आंदोलन केलं; शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल

नगर —  गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताचे २० जवान शहीद झाले. त्यामुळे भारतीयांनी चीनविरोधात रोष व्यक्त केला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी चीनविरोधात आंदोलने करण्यात आली. अहमदनगरमध्येही शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी चीनविरोधात आंदोलन केले. मात्र, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पक्षाचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चीनविरोधात आंदोलन करताना जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चीनच्या कुरापतीचा निषेध करण्यासाठी बुधवारी दिल्लीगेट येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. चीनच्या ध्वजाची आणि चिनी वस्तूंची होळी करण्यात आली होती. मात्र, हे आंदोलन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले जमावबंदीचे आदेश व साथरोग नियंत्रण कायद्यातील आदेशांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी राजेंद्र गर्गे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, योगिराज गाडे, तसेच अभिषेक कळमकर यांच्यांसह पंधरा ते वीस जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चिनी कंपनीचे मोबाइल फोडले 

दिल्लीगेट येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चिनी कंपनीचे मोबाइल रस्त्यावर फोडले. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून निषेध करण्यात आला. शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले, ‘जनता ही आपल्या जवानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. चीनचा बिमोड करण्यासाठी त्यांच्यावर सर्वच प्रकारे बहिष्कार घातला पाहिजे. त्यामुळे इथून पुढे चिनी वस्तू वापरायच्या नाहीत, अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली.’ 
यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, सुरेश तिवारी आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close