राजकीय

पिककर्जासाठी रविकांत तुपकर झाले आक्रमक विविध बँकांमध्ये धडक देवून केला ‘ऑन द स्पॉट फैसला

            ✍️ मोहन चौकेकर
बुलडाणा — पेरणी सुरु झाली आहे मात्र अद्यापही लाखो शेतकऱ्यांना पिककर्ज मिळाले नाही. पिककर्जासाठी शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या पाहता रविकांत तुपकर यांनी तालुका निहाय कृतीशील उपक्रम हाती घेतला आहे. त्या नुसार पिककर्जाबाबत ऑन द स्पॉट फैसला

करण्यासाठी स्वतः रविकांत तुपकर यांनी कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह आज १५ जून रोजी विविध बँकांमध्ये धडक देवून शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या अडचणी ऑन द स्पॉट सोडविल्या. यापुढे पिककर्जासाठी टाळाटाळ केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना दिला.
गेल्या वर्षीचा खरीप आणि रब्बी हंगाम अतिवृष्टी व गारपीटीने शेतकऱ्यांच्या हातातून गेला तर यावर्षी कोरोना महामारीने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले. कृषीमालाला भाव नाही. त्यामुळे आजही कृषिमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यात आता पेरणी सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी खते, बि-बियाणे व पेरणीच्या खर्चाची तडजोड करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लाखो शेतकरी पिककर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांचे दार ठोठावत आहे. मात्र विविध कारणे सांगून बँकांकडून पिककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. स्टॅम्प पेपर चा तुटवडा तसेच काही शेतकरी कर्जमाफी होऊन मृत झालेले आहेत त्यांच्या वारसांना पीककर्ज दिले जात नाहीये. साईट बंद असल्याने अनेकांचे थंब झाले नाही याशिवाय कर्जमाफीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे पिककर्ज अडवून धरले जात आहे. नवीन कर्जदारांनाही कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासह पिककर्जाबाबत शेतकऱ्यांच्या विविध अडचणी रविकांत तुपकर यांच्याकडे ‘स्वाभिमानी’ हेल्पलाईन सेंटर मध्ये शेतकऱ्यांनी मांडल्या. शेतकऱ्यांच्या या तक्रारी पाहता रविकांत तुपकर यांनी पिककर्जाबाबत कृतीशील कार्यक्रम हाती घेतला आहे. ‘ऑन द स्पॉट फैसला’ करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी रविकांत तुपकर आज १५ जून रोजी बाहेर पडले. बुलडाण्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इंडियन ओवरसीस बँक, स्टेट बँक विभागीय व्यवस्थापक कार्यालय व देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांमध्ये रविकांत तुपकरांनी धडक दिली. संबंधित व्यवस्थापकांना धाब्यावर धरत त्यांनी जाब विचारला. पिककर्जाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी संबंधित बँकांमध्ये तगडा बंदोबस्त लावला होता. रविकांत तुपकारांना पिककर्जाबाबत येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचण्यासोबतच बँकांकडून शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या वागणुकीबाबत बँक अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. विदर्भ कोकण ग्रामीण बँक, इंडियन ओवरसीस बँक, स्टेट बँक विभागीय व्यवस्थापक कार्यालय व देऊळघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांमध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा ‘ऑन द स्पॉट फैसला’ करून पिककर्जाचा मार्ग मोकळा करून दिला. देऊळघाटच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तर श्रावण बाळ व निराधार यांच्या पैशाला होल्ड लावला होता. रविकांत तुपकारांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांना सदर होल्ड ही काढायला लाऊन श्रावण बाळ व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा मिळवून दिला. पिककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँक अधिकाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशाराही यावेळी रविकांत तुपकरांनी संबंधित बँक अधिकार्यांना दिला. बुलडाणा तालुक्यानंतर आता ते मोताळा तालुक्यातील बँकांमध्ये धडक देऊन शेतकऱ्यांच्या पिककर्जासंबंधातील अडचणी सोडविणार आहेत. यावेळी राणा चंदन, पवन देशमुख, आकाश माळोदे, दत्ता जेउघाले, गोपाल जोशी, मोहम्मद साजिद, कडूबा मोरे, मोहन मोरे यांच्यासह बुलडाणा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
✍️ मोहन चौकेकर
SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close