Corruption of contractor in free food scheme; Plight of workers मोफत भोजन योजनेत ठेकेदार व अधिकारी मालामाल; कामगारांचे मात्र हाल

बीड — नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत भोजन देण्याची योजना कामगार विभागामार्फत सुरू आहे. ठराविक कामगारांपर्यंतच या योजनेचा लाभ पोहोचत असून कागदोपत्री खेळ करत ठेकेदार अन् कामगार कल्याण अधिकारी गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेत स्वतःची तुंबडी भरून घेत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे.
बीडचा कामगार विभाग सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे.कामगारांच्या कल्याणाच्या अनेक योजना सुरू असल्या तरी माहिती अभावी योजनांच्या लाभापासून कामगारांना वंचित राहावं लागत आहे.त्यातच या विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठेकेदारांपासून अधिकाऱ्या पर्यंत सर्वच मलिदा लाटत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. कामगारांच्या पाल्यांना मिळणारी स्कॉलरशिप देखील मिळणं अवघड होऊन बसलं आहे.जो कामगार अधिकाऱ्यांचे खिसे गरम करेल त्याच्याच पाल्याचा स्कॉलरशिप चा अर्ज मंजूर केला जातो. आधीच खायचे वांदे त्यातून अधिकाऱ्यांना पैसा द्यायचा कुठून यामुळे अनेकांचे अर्ज कामगार कार्यालयात धूळ खात पडले आहेत.तीच परिस्थिती मोफत भोजन योजनेची आहे. ठराविक कामगारांना मोफत भोजनाचा डबा द्यायचा.उर्वरित नोंदणीकृत कामगारांची फक्त नावे टाकून धडाधड बिले उचलायची हा गोरख धंदा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे माध्यमांनी ही बाब प्रकाशात आणली तरी कामगार अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत पाण्यावर लोणी काढायचं काम करत आहेत. शहरातील हजारो कामगार या बोगसगिरीमुळे मोफत भोजन योजनेपासून वंचित राहू लागले आहेत. या धंद्यातून ठेकेदार व अधिकारी मालामाल होत असले तरी कामगारांचे मात्र वांदे होत आहेत.अनेक नोंदणीकृत कामगारांना या योजनेची माहिती देखील होऊ दिली जात नाही. कामगारांना कष्ट करून स्वतः च व कुटुंबाचं पोट भरायचं पडतं भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी रस्त्यावर उतरायचं तर रात्रीची चूल पेटायचं अवघड होतं. या मुख्य समस्येचं इंगित ठेकेदार व अधिकाऱ्यांना माहित आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचा हा खेळ राजरोस सुरू आहे. ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराला आळा घालत त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तरी कारवाई करावी अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे.