Dhanushyaban Thackeray or Shinde will be decided on Friday धनुष्यबाण ठाकरेंचं की शिंदेंचं शुक्रवारी होणार फैसला

मुंबई — शिवसेना कोणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असून कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 7 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईसाठी धावपळ उडाली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची धामधूम सुरु असताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाचं हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे.यासंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती.त्यानुसार ती मुदत संपणार आहे. त्यामुळे दोन्ही गट कागदपत्रे घेऊन दिल्लीत रवाना झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज वकिलांची भेट घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाला काय उत्तर द्यायचे,आणखी कोणत्या प्रकारचे पुरावे सादर केले पाहिजेत याबाबत खल होऊ शकतो. तसेच या सगळ्या कायदेशीर लढाईसाठी
आणखी काही अवधी देण्यात यावा अशी चर्चा देखील करण्यात आली.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक तीन नोव्हेंबर रोजी होत आहे. या पोटनिवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे.14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचा धनुष्यबाण ठाकरेंचं की शिंदेचं, याचा फैसला झाल्यास अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.