क्राईम

पारगाव मध्ये शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांचा नंगानाच; तीन जण जखमी

चार घरांना केल लक्ष्य, विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना धमकावत केले पलायन

उस्मानाबाद —  जिल्ह्यातील पारगाव येथे शनिवारी मध्यरात्री गाव झोपेत असताना सशस्त्र दरोडेखोरांनी हैदोस घालत चार घरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना धमकावत तीन जणांना गंभीर रित्या जखमी करत लाखो रुपयांची लूट त्यांनी केली. जखमींना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात का होईना घरात पैसा अडका ठेवलेला असतो याच परिस्थितीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने शनिवारी मध्यरात्री संपूर्ण गाव झोपेत असताना अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करत संपूर्ण गाव वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी चार वेगवेगळ्या घरांना आपले लक्ष करत गावकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील कपाट कडून सोन आणि रोख रक्कम लुटून नेली ‌ अण्णा मनोहर डोके यांच्या घरावर दरोडा टाकला असता त्यांनी दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडी आणि तलवारीने वार करत त्यांना गंभीर रित्या जखमी केले. पारगाव चे माजी सरपंच महादेव रावजी आखाडे यांच्या घरावर देखील दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र ते जागे असल्याचे लक्षात येतात या दरोडेखोरांनी पळ काढला. याबरोबरच भुसार मालाचे व्यापारी असलेले अरुण दगडू मोटे यांच्या घरावर देखील दरोडा टाकला. त्यांनीदेखील दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता धारदार शस्त्राने वार करत त्यांना देखील जखमी केले. त्यांच्या पत्नी कालींदा अरुण मोटे यांनी यावेळी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर देखील धारदार शस्त्राने वार केले या हल्ल्यात दोघे पती-पत्नी जखमी झाले आहेत. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून सोने-नाणे व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला.सशस्त्र दरोडेखोर गावात नंगानाच करत असताना विरोध करणाऱ्यांना धमकावत व शस्त्राच्या बळावर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले. दरोडेखोर पळून गेल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती देत जखमींना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या सशस्त्र दरोड्यामूळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close