ताज्या घडामोडी

Fountain of New Consciousness, Navdurga Kaku of Beed, All Accomplished — Kesharbai Kshirsagar नवचैतन्याचा झरा, सर्व सिद्धी प्राप्त असणारी बीडची नवदुर्गा काकू — केशरबाई क्षीरसागर

केशरकाकू क्षीरसागर बीडच्या राजकारणात चमत्कार होत्या.ज्याकाळात बायकांना घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता त्याकाळात काकू विधानसभेवर निवडून गेल्या. मूळच्या कर्नाटकच्या विजापूरमध्ये माहेर असणाऱ्या केशरकाकू सोनाजीराव क्षीरसागर यांच्याशी लग्न झाल्यावर बीडला आल्या. काकुना चार मुली आणि चार मुलं. मी खऱ्या अर्थाने अष्टपुत्र सौभाग्यवती आहे असं म्हणायच्या त्या. सोनाजीरावाना सगळे नाना म्हणायचे. नानांचा गावात दबदबा होता. विरोधक म्हणतात त्यांची गुंडगिरी होती. पण नानांची स्वतःची राजकीय कारकीर्द सुरु होत असताना त्यांनी त्याकाळी आपल्या बायकोला राजकारणात पुढे आणले ही एक आश्चर्याची गोष्ट. काकूंचा सगळ्यात मोठा गुणविशेष म्हणजे त्या कायम आत्मविश्वासाने वावरल्या. खरंतर त्यांचं वेगळेपण खूप पुर्वीच लक्षात आलं असेल घरातल्या लोकांच्या. त्यांच्या हाताला ऋत्विक रोशनसारखी अकरा बोटं. बीडचा माणूस म्हणेल तसं नाही. ऋत्विकला काकू सारखी अकरा बोटं आहेत म्हणा. काकू नेहमी सांगायच्या की त्यांच्या लहानपणी महात्मा गांधी विजापूरला आलेले असताना त्यांच्या मोटारीपुढे मी घोषणा दिल्या. महात्मा गांधी की जय! मग गांधीजीनी आपल्या गळ्यातला एक हार फेकला. तो काकूंच्या गळ्यात पडला. तो त्यांचा राजकीय, सामाजिक प्रवासाचा आरंभ.

सासरी आल्यावर काकूंनी गावातल्या बायकांना घेऊन एक नाटक पण बसवलं. हे नाटक करायला प्रत्येक बाईच्या घरी जाऊन परवानगी घेताना खूप कसरत करावी लागली. खरंतर बायकांचं नाटक बसवायचं तसं काही फार मोठं कारण नव्हतं. पण काकूंनी नकळत बंडखोरी सुरु केली. जी आयुष्यभर त्या करत राहिल्या. त्यांची राजकीय कारकीर्द संपते की काय असं कित्येक वेळा वाटलं पण त्या विरोधकांना पुरून उरल्या. एकदा त्यांच्या नवऱ्यावर खुनाचा आरोप झाला. अटक झाली. केस खूप काळ चालू होती. पण त्यातून कुटुंब सहीसलामत बाहेर पडलं. पुढे काकूंच्या मुलावर खुनाचा आरोप झाला. खूप चर्चा झाली. मुलगाही निर्दोष सुटला. पण या घटनांमुळे बीड जिल्ह्यात आपोआप क्षीरसागर घराण्याची एक दहशत सुद्धा तयार झाली. त्याचा परिणाम असा झाला की या घराण्याबद्दल अनेक दंतकथा तयार झाल्या. काकुंकडे नोटा छापायची मशीन आहे, या लोकांनी पोलीस अधिकारीच गायब केला अशा एक ना अनेक गोष्टी बीडमध्ये चवीने बोलल्या जातात. ज्याला काही पुरावा मात्र नाही.

काकूंची सगळ्यात महत्वाची गोष्ट होती त्यांचं धाडस. काकू जातीने तेली. या जातीची बीडमध्ये फार लोकसंख्या नाही. तरीही काकू आमदार, खासदार म्हणून निवडून येत राहिल्या. त्यातही अनेक मातब्बर नेते असताना काकू निवडून यायच्या. इंदिरा गांधी एकदा बीडला आल्या होत्या तेंव्हा लाखोंच्या सभेत व्यासपीठावर फक्त तीन महिला होत्या. एक इंदिरा गांधी, दुसर्या कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि तिसऱ्या केशरकाकू. हे दृश्य देशात सुद्धा कुठे दिसलं नसेल ते बीडसारख्या ठिकाणी दिसलं. काकू असताना बीडचं पुरुष नेतृत्व हतबल असायचं. त्याकाळात काकूंनी बीडमध्ये साखर कारखाना सुरु केला. इंदिरा गांधींची परवानगी मागायला गेल्या तर इंदिरा गांधी म्हणाल्या ‘देशमें एक भी महिला शुगर factory की चीफ प्रमोटर नहीं है. ‘ इंदिरा गांधीना आश्चर्य वाटलं होतं की ही एका गावातली स्त्री साखर कारखाना कसा चालवेल? पण काकुनी ते आव्हान यशस्वीरित्या पेललं.

काकूंची आणि इंदिराजींची एक भेट फार मजेशीर आहे. काकू इंदिरा गांधीना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेल्या होत्या. इंदिराजींच्या हातात पेन्सिल होती. अचानक त्यांनी ती टेबलवर आपटली आणि म्हणाल्या, जल्दी बोलो मुझे बाहर जाना है.

काकू म्हणाल्या, ‘ आपने पेन्सिल टेबलपर पट्क दी, मैं डर गई हूं. मैं अभी नहीं कह सकती. मुझे हिन्दी अभी आती नहीं.

इंदिरा गांधी हसल्या आणि त्यांनी काकूंना निवांत भेटायला बोलवलं. असंच एकदा काकू बीड जिल्ह्याला दूरदर्शन केंद्र मिळावं या मागणीसाठी शिष्टमंडळ घेऊन इंदिरा गांधीना भेटायला गेल्या होत्या. त्याकाळी बीड जिल्ह्याचा कुटुंब नियोजनात पहिला क्रमांक आला होता. इंदिरा गांधी म्हणाल्या बीडला दूरदर्शन केंद्र देणं अवघड आहे. बीडची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे ते नियमात बसत नाही. त्यावर काकू म्हणाल्या, मग आमची चूकच झाली. लोकसंख्या वाढवल्याशिवाय दूरदर्शन केंद्र मिळणार नसेल तर आम्ही पुन्हा लोकसंख्या वाढवून दाखवू. इंदिराजी गालातल्या गालात हसल्या आणी लवकरच बीडला दोन दूरदर्शन केंद्रांची मंजुरी मिळाली.

काकू एकदा रशिया दौऱ्यात गेल्या होत्या. त्यांचा मुक्काम ज्या हॉटेलात होता तिथे एक खासदार चावी सोबत न घेता बाहेर पडला. रूमचं दार लॉक झालं. तो गोंधळून गेला. त्याने अनुभवी खासदार शिवराज पाटील चाकूरकर यांची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांना उठवलं. पाटील बाहेर आले. पण ते सुद्धा पुन्हा चावी न घेताच. त्यांच्या रूमचं दार पण लॉक झालं. बाहेर आवाज ऐकून काकू आल्या.. त्यांच्या रूमचं दार पण लॉक झालं. बाहेर आवाज ऐकून काकू आल्या. तर पाटील त्यांना म्हणाले, तुम्ही बाहेर कशाला आला? आता तुमचाही दरवाजा बंद झाला.’ तर काकू त्यांना रूमची चावी दाखवत म्हणाल्या मी माझ्या रूमची चावी सोबत घेऊन आलेय. शिवराज पाटील आणी दुसरे खासदार काकूंकडे हैराण होऊन बघत राहिले. छोट्याश्या गावातून आलेल्या काकूचं व्यवहारिक शहाणपण भल्या भल्या नेत्यांना थक्क करणारं होतं

काकूंनी स्वतःला कमी शिक्षण मिळालं तरी गोरगरिबांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचावी यासाठी प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्रात संस्थांचं जाळं उभा करून खेडोपाडी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं. याच संस्थांतून शिकून मोठे झालेल्या ज्ञानवंतांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. अडाणी समजल्या जाणाऱ्या काकूंनी खरी शिक्षण महर्षी म्हणून घेतलेली झेप भल्याभल्यांचे डोळे दिपवणारी आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलीही शिक्षणाच्या प्रवाहात येत गेल्या. सामाजिक रूढी परंपराची जोखड‌ आपोआप तुटल्या गेली. सावित्रीबाई फुले यांच्यानंतर खरी ज्ञानगंगा अव्याहत सुरू ठेवण्याचे काम त्यांनी केलं.अज्ञानाचा राक्षस त्यांनी मारला. सरस्वती होऊन ज्ञानदान दिलं. मागासलेला बीड जिल्हा विकासाच्या प्रवाहात आणून लक्ष्मीच रूप त्यांनी दाखवून दिलं.नवमीच्या दिवशी स्व.काकूंच पुण्यस्मरण आलं आणि या नवदुर्गेच पुन्हा स्मरण झालं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आठवण काढणं ही सुद्धा त्यांना आदरांजलीच आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button