Mp. Pritam Munde met the Union Railway Minister for Ashti-Mumbai railway service आष्टी-मुंबई रेल्वेसेवेसाठी खा.प्रितम मुंडे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट

अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना
बीड — नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी हा साठ किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आष्टी रेल्वेस्थानकावर नगर-आष्टी डेमु रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वेसेवेचा विस्तार करून आष्टी ते मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वे सुरू करण्यात यावी अशी पुनःश्च मागणी खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी भेट घेतली.बीड जिल्ह्यासाठी रेल्वेची सेवा मुंबई पर्यंत सुरू होणे जेवढे फायदेशीर आहे तेवढेच रेल्वे विभागासाठी देखील फलदायी ठरणार आहे. बीडकरांच्या हिताचा आणि रेल्वेच्या फायद्याचा सारासार विचार करून आष्टीपासून मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वेवाहतूक सुरू करण्यात यावी, रेल्वे हा बीड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे अशी मागणी खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खासदार प्रितम मुंडे यांच्या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ तोडगा काढण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिल्या आहेत.बीड जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेची भूमिका महत्वाची असल्यामुळे आपण याबाबत सकारात्मक आहोत असे ही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थिती होते.