क्राईम

डोम कावळ्यांच्या शेतकऱ्यां भोवती घिरट्या, केदारनाथ जाजू पकडला ,बोगस बियाणांचा खेळ सुरू

बीडशहरातील नवा मोंढा रोडवरील केदारनाथ रमेशलाल जाजू या व्यापाऱ्याने व्यंकटेश ऍग्रो एजन्सी मधून शेतकऱ्यांना बोगस कपाशी बियाणे विक्रीचा धडाका लावला होता परंतु शेतकऱ्यांच्या मरणावर टपलेल्या या डोम कावळ्याच्या पापाचा घडा भरला अन् कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या जाळ्यात तो रंगेहात पकडला गेला.

शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी संकटाने घेरला गेलेला असताना बोगस बियाणांचा व्यापार करणाऱ्यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथील एका शेतकऱ्याने यासंदर्भात केदारनाथ रमेश लाल जाजू यांच्या मालकीच्या व्यंकटेश कृषी सेवा केंद्रात बोगस कपाशी बियाणे विक्रीसाठी ठेवल्याची तोंडी तक्रार कृषी विभागाच्या भरारी पथकाकडे केली होती. शिवाय यापूर्वी त्या शेतकर्‍याने या कृषी सेवा केंद्रातून फेल्क्सीक्वॉट व रेडिक्वॉट या ब्रॅंडनेमचे बोगस बडीगार्डचे तीन नग 1 हजार रुपये दराने खरेदी केले होते. मात्र व्यंकटेश कृषी सेवा केंद्रातून प्रत्यक्षात कावेरी सीडस् च्या कपाशी बियाण्यांचे 30 मे रोजीचे बील संबंधित शेतकर्‍यास देण्यात आले होते. 
सोमवारी याच शेतकर्‍याने पुन्हा एकदा फेल्क्सीक्वॉट ब्रॅण्ड नेमचे प्रति 1 हजार रूपये नग याप्रमाणे खरेदी केले. परंतु खरेदीपूर्वी शेतकर्‍याने  500 रुपयांच्या ज्या 4 नोटा व्यापारी जाजू यास दिल्या होत्या त्याचे फोटो काढून घेतले होते. भरारी पथकाने मारलेल्या छाप्यात त्याच नोटा जाजू यांनी स्वत: दुकानाच्या गल्ल्यातून काढून दिल्या. त्यामुळे बोगस बियाणे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. शिवाय दुकानाच्या रजिष्टरची तपासणी केली तेव्हा 30 मे रोजी कावेरी सीडस् च्या बियाण्यांची कोणतीही विक्री झालेली नाही. शेतकर्‍यास फेल्क्सीक्वॉट या ब्रँन्डनेमचे बोगस कापूस बियाणे देवून पावती मात्र विक्रेत्याकडून कावेरी सीडस या बियाण्यांची दिली जात होती. शिवाय बोलगार्ड ऐवजी बडीगार्ड 2 असा उल्लेख कपाशी बियाणावर आढळून आला. याशिवाय अन्य गंभीर बाबी या कृषि सेवा केंद्रात आढळून आल्या. त्यानंतर जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी तथा बियाणे निरीक्षक आर.यु.जोगदंड यांनी व्यंकटेश कृषि सेवा केंद्राचे मालक केदारनाथ रमेशलाला जाजुविरुध्द पेठ बीड ठाण्यात तक्रार नोंदवली. या व्यापाऱ्यांविरोधात
कलम 120,2,बियाणे अधिनियम 1966 चे कलम 17 (ए), 17(बी), बियाणे अधिनियम 7 ते 14 व 38 बियाणे नियंत्रण आदेश कलम 7, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो उपनिरीक्षक कैलास भारती करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close